Toress Scam चं युक्रेन कनेक्शन; मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर अन्... कसा शिजला कट?

Torres च्या जाळ्यात फसले लाखो मुंबईकर; कंपनीच्या मालकाचा ठावठिकाण सापडला, घसघशीत परताव्याच्या नादात मुंबईकरांचे कोट्यवधी पैसे बुडाले... पाहा टोरेस घोटाळ्यात आज नवं काय घडलं? 

सायली पाटील | Updated: Jan 8, 2025, 09:06 AM IST
Toress Scam चं युक्रेन कनेक्शन; मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर अन्... कसा शिजला कट?  title=
Torres scams 1 lakh 5 thousand Mumbai fraud 3 people arrested latest update

Torres scams latest update : सोनं, चांदी आणि प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीनं तयार करण्यात आलेले हिरे यांच्यामध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या घसघशीत परताव्याचं आमिष दाखवत टोरेस नावाच्या कंपनीनं लाखो गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला. आठवज्याभराच्या हिशोबानं व्याज देणाऱ्या या कंपनीनं रातोरात संपर्काचे सर्व पर्याय बंद केले आणि हा घोटाळा जसजसा समोर आला तसतशी अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकू लागली होती. 

सदर प्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला असून, जवळपास सव्वालाख मुंबईकरांना या टोरेस कंपनीनं गंडा घातल्याचं म्हटलं गेलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये कंपनीनं हजारो कोटींची फसवणूक केली. टोरेस ज्वेलर्स कंपनीकडून लाखो मुंबईकरांची फसवणूक करत कमी वेळेत चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. या आमिषापोटी अनेकांनी घरं आणि दागिने गहाण ठेवून या योजनांमध्ये गुंतवणूक केली होती. जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे जात आहे तसतसं आता फसवणुकीचा आकडा 7 ते 8 हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सध्या मुंबई शहरातील या मोठ्या घोटाळ्याचं बिंग फुटताच पोलिसांनी मंगळवारी शहरातून पळ काढण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये कंपनीचा संचालक, जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला बेड्या ठोकण्यात आल्या. तर, कंपनीचा संस्थापक मात्र सध्या युक्रेनला पसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

टोरेस कंपनीचा संस्थापक जॉर्न कार्टर, व्हिक्टोरीया कोवालेंको यांनी थेट युक्रेनला पळ काढल्याचं म्हटलं जातं. तर या कंपनीचा संचालक हा एक आधार कार्ड ऑपरेटर असल्याचं सांगितलं जात आहे. मुळचा मुंबईचा असणारा सर्वेश अशोक सुर्वे हा आधार कार्ड ऑपरेटर असून, कंपनीचा संचालक बनवण्यासाठी त्याचं नाव, आधार कार्ड आणि डिजीटल सहीचा वापर करण्यात आला होता. चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार त्याला महिना 22 हजार रुपये इतका पगार दिला जात होता. 

हेसुद्धा वाचा : दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने Torres Company मध्ये गुंतवले 4,00,00,000! एवढा पैसा कुठून आणला? धक्कादायक खुलासा

 

कंपनी  स्थापन करून पुरेसा ऐवज जमवून नव्या वर्षात सर्व कार्यवाही थांबवत पळ काढण्याचाच टोरेसचा मुख्य हेकतू होता. त्याच दृष्टीकोनातून हातपायही मारण्यात आले. टप्प्याटप्प्यानं कंपनीनं सेवा बंद करण्यास सुरुवात करत काही तांत्रिक बिघाडाची कारणं समोर केली. 29 डिसेंबरला ऑनलाईन सेवा बंद करत रोख स्वरुपात पैसे स्वीकारण्यास सुरुवात झाली. गुंतवणुकदारांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवल्यानं तितक्याच मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली गेली आणि एका क्षणात कट ठरलेल्या मार्गानं जात असतानाच कंपनीनं पोबारा केला.