Youtube वर Video पाहून त्याने फुलवली चाफ्याची बाग! आता दर महिन्याला करतो 'इतकी' कमाई

Sucess Story: सामान्यपणे मोबाईलचा वापर हा टाइमपाससाठी केला जातो. मात्र ठाण्यातील एका तरुणाने युट्यूबवरुन शेतीला सुरुवात केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 8, 2025, 08:35 AM IST
Youtube वर Video पाहून त्याने फुलवली चाफ्याची बाग! आता दर महिन्याला करतो 'इतकी' कमाई title=
युट्यूब पाहून केली शेती

Sucess Story: इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. ही म्हण ठाणे जिल्ह्यातील वांगणीजवळील डोणे गावातील संदेश सारंगा नावाच्या तरुणाने खरी करुन दाखवली आहे. संदेश हा शेतकरी कुटुंबातील असून त्याने युट्यूब पाहून केलेला एक प्रयोग एवढा यशस्वी ठरला आहे की त्यामधून तो महिन्याला एखाद्या कॉर्परेट कर्मचाऱ्याला लाजवेल एवढी कमाई करतोय. या तरुणाने नेमकं काय केलं आहे पाहूयात...

कोण आहे हा तरुण शेतकरी?

वांगणीतील संदेश सारंगा यांनं कोरोना काळात शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला काय करता येईल हे एक्सप्लोअर करताना संदेश युट्यूबवर नवनवीन व्हिडीओ पाहायचा. यातूनच त्यांनं आपल्या शेतात चाफ्याची झाडे लावण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी लागणारे पैसे उभारण्याच्या उद्देशाने त्याने कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन शासकीय अनुदान मिळवलं. डोणे गावातील आपल्या शेतात संदेशने युट्यूब पाहून एक एकरामध्ये चाफ्याची बाग फुलवली. एक एकरात सौंदर्य जातीच्या चाफ्याची 300 झाडं संदेशने लावली. 

किती कमाई करतो?

3 बाय 3 मीटर अंतरावर संदेशने एक एकरामध्ये या झाडांची लागवड केली. 4 वर्षांच्या या बागेतून दररोज संदेशला आता रोज 1500 ते 1800 फुलांचं उत्पन्न मिळतंय. कल्याण तसेच दादरच्या फुल मार्केटमध्ये चाफ्याच्या फुलाला सरासरी एक ते दोन रुपयांचा भाव मिळतो. गणेशोत्सव काळात हाच भाव जवळपास पाच ते दहापट इतका झालेला असतो. या बागेतून सर्व खर्च वगळता संदेश सारंगा याला महिन्याकाठी सरासरी 30 ते 45 हजारांचं उत्पन्न मिळतं. 

मोबाईलचा योग्य वापर

चाफ्याच्या फुलांना बाजारात मोठी मागणी असते. शिवाय चाफ्याच्या बागेतून मिळणारं उत्पन्न हे दीर्घकाळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत शेतात नवनवीन प्रयोग केल्यास त्यांना शाश्वत उत्पन्न मिळू शकेल असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. सध्याची तरुणाई ही मोबाईलच्या विळख्यात सापडलीय. मात्र मोबाईलचा सदुपयोग केला तर त्यातून उत्पन्नाचा एक चांगला मार्गही मिळू शकतो हे या युवा शेतकऱ्यानं दाखवून दिलय. त्याचा आदर्श इतर युवकांनीही नक्कीच घ्यायला हवा, असं मत आता व्यक्त केलं जात आहे.