Devendra Fadnavis : वर्षा बंगला पाडणार? खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनीच दिली सर्व प्रश्नांची उत्तरं; स्पष्टच म्हणाले...

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झाला पण अद्याप...   

सायली पाटील | Updated: Feb 5, 2025, 08:23 AM IST
Devendra Fadnavis : वर्षा बंगला पाडणार? खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनीच दिली सर्व प्रश्नांची उत्तरं; स्पष्टच म्हणाले...  title=
CM devendra fadnavis on delaying in shifting varsha Bungalow mumbai news political update

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल महायुतीच्या पारड्यात पडला आणि राज्यात भाजपप्रणित महायुतीचीच सत्ता आली. मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे शपथविधी होऊन प्रत्येकाला शासकीय निवासस्थानंही सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावेसुद्धा शासकीय निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या वर्षा बंगल्याची नोंद करण्यात आली. पण, बरेच दिवस उलटूनही अद्याप मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी वास्तव्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळं विरोधी पक्षांपासून समाजाच्या अनेक स्तरांमध्ये याविषयीची चर्चा सुरु झाली. 

वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याची चर्चा असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिला आणि पुन्हा एकदा वर्षा बंगला अन् त्याभोवती फिरणाऱ्या चर्चांना आणखी वाव मिळाला. त्याच दरम्यान एका माध्यमसमुहाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली. जिथं वर्षा बंगल्याविषयीचा प्रश्न त्यांना टाळता आला नाही. अखेर मुख्यमंत्र्यांनीच इथं मुक्कामी जाण्यास नेमकी दिरंगाई का होतेय, यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं देत चर्चांना पूर्णविराम दिला. 

हेसुद्धा वाचा : Video : 'वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

 

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? 

फडणवीस वर्षा बंगल्यात वास्तव्यास का जात नाहीत, वर्षा बंगल्यात अमूक, तमूक... आणि अगदी हा बंगला पाडण्याविषयीच्याही चर्चा समोर आल्याचं पाहता त्यांनी काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या. 'वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का?' असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. 

माजी मुख्यमंत्र्यांनी हे निवासस्थान सोडल्यानंतर आपण तिथे वास्तव्यास होतो किंबहुना जाणार आहोत. पण, तत्पूर्वी तिथं काही लहान- मोठी कामं सुरु होती असं त्यांनी सांगितलं. 'माधी मुलही दहावीत शिकत आहे', असं सांगत 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होत असल्यामुळं परीक्षेनंतर आपण तिथं राहायला जाऊ असं तिनंच सांगितल्यामुळं आपण तूर्तास वर्षा निवासस्थानी वास्तव्यास गेलो नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं. 

मुलीची परीक्षा पार पडताच आपण वर्षा या निवासस्थानी मुक्कामी जाणार असल्याचं सांगत एकंदरच सुरु असणाऱ्या चर्चा पाहता आपण यावर उत्तरही देऊ नये असं वाटतं, इतक्या मोजक्या शब्दांत त्यांनी काही मुद्दे अधोरेखित करत विरोधकांनाही उत्तर दिलं.