Hemant Dhome Slames Rahul Solapurkar: अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवली याचे पुरावेही आपल्याकडे आहेत, असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं होतं. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं होतं. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. प्रसिद्ध अभिनेता आणि हेमंत ढोमे याने राहुल सोलापूरकरचे नाव न घेता टीका केली आहे.
पेटारे-बिटारे काहीच नव्हतं. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. त्यासाठी त्यांनी हुंडी वटवली याचे पुरावे आहेत. महाराजांनी औरंगजेबाचा वकील, त्याच्या बायकोला लाच दिली होती. औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले, असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर नेत्यांनीही कडाडून टीका करत वक्तव्याचा निषेध केला होता. आता अभिनेता हेमंत ढोमे याने अभिनेत्याला खडे बोल सुनावले आहेत.
हेमंत ढोमे याने ट्विट करत म्हटलं आहे की, इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या! आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमधेच रमूद्या! रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात, असा टोला हेमंतने लगावला आहे. तसंच, असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे. उगाच सगळे सोलापूरकर बदनाम होतात, असंही त्याने पुढे म्हटलं आहे.
इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या!
आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमधेच रमूद्या!रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात!
असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे!
उगच…
— Hemant Dhome | फसक्लास ढोमे (@hemantdhome21) February 4, 2025
पेटारे-बिटारे काहीच नव्हतं. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. त्यासाठी त्यांनी हुंडी वटवली याचे पुरावे आहेत. महाराजांनी औरंगजेबाचा वकील, त्याच्या बायकोला लाच दिली होती. औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खूण, पुरावे आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हंटलं, की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली, की इतिहासाला छेद दिला जातो असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केले आहे.
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केलीये. शिवाजी महाजारांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर महाराष्ट्रात वादंग उडालं होतं. त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अखेर माफी मागितली आहे. जगभर गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक व्याख्याने उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळं छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनातसुद्धा येऊ शकत नाही. त्याचा विचारसुद्धा होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांचा नखभरसुद्धा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, असं सोलापूरकर यांनी म्हटलं आहे