मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक तलाव भरून वाहायला लागला आहे. चांगल्या पावसामुळे तुळशी तलावातील पाणी ओसंडून वाहू लागले आहे. मागील वर्षी तुळशी तलाव ९ जुलैला भरला होता. यंदा १२ जुलैला तुळशी तलाव भरला आहे. तुळशी तलावाची पाणी साठवण क्षमता ८०४६ दशलक्ष लीटर इतकीच आहे. मुंबई शहराला एका वर्षासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. तर दररोज ४५०० दशलक्ष लिटरची गरज भासते. मात्र प्रत्यक्षात सातही तलावांमधून ३९०० दशलक्ष लिटर पाणी आणले जाते.
मुंबई आणि शहर परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला. या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात पाच टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, सातपैकी एक अर्थात तुळशी तलाव पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी दिलादायक बाब आहे.
Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Chief Public Relations Officer (CPRO): One of Mumbai's sources of water supply, lake Tulsi started overflowing, today. (File pic) pic.twitter.com/1i2NkpY99x
— ANI (@ANI) July 12, 2019
काही दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला त्यामुळे तलावात पाणीसाठा वाढला आहे. तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा वाढू लागला आहे. एप्रिल - मे महिन्या दरम्यान तलावातील पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे मुंबईला पाणीपुवरठा होणार की नाही, अशी चिंता होती. मात्र, राखीव साठ्यातून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता चांगला पाऊस झाल्याने आणि तलावात चांगला साठा झाल्याने पाणीप्रश्न तुर्तात मिटला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये एकूण ३ लाख ६० हजार दशलक्ष पेक्षा जास्त लीटर पाणीसाठा झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सातही तलावांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे.