अंबरनाथ, वसईमध्ये दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

राज्यात कोरोना बळींची संख्या वाढली

Updated: Apr 6, 2020, 12:32 PM IST
अंबरनाथ, वसईमध्ये दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू title=

चंद्रशेखर भुयार - अंबरनाथ, प्रथमेश तावडे, वसई : राज्यात आणखी दोन ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे बळी गेले आहेत. अंबरनाथ आणि वसई येथे कोरोनाचे दोन बळी गेल्यानं राज्यातील कोरोना बळींची संख्या आणखी वाढली आहे.

उत्तर प्रदेशातून परतलेल्या कोरोनाबाधित व्यक्तिचा मृत्यू

अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. ही ५० वर्षीय व्यक्ती १९ मार्च रोजी उत्तर प्रदेशात एका कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती. हा सोहळा आटोपून तो घरी परतला आणि त्याची प्रकृती बिघडली. त्याला मधुमेह आणि ह्रदयविकाराचा त्रास होता. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला मुंबईतील भाभा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. त्याला अन्य आजार असल्यानं त्याचा मृत्यू कोरोनामुळेच झाला की ह्रदयविकारानं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

वसईमध्ये कोरोनाचा दुसरा बळी

वसईमध्येही एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. या ६५ वर्षीय रुग्णावर दोन दिवसांपासून उपचार सुरु होते. वसईतील ओम नगर परिसरातील हा रुग्ण असून तो पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत होता, अशी माहिती महापौरांनी दिली. नालासोपाऱ्यातील रिद्धीसिद्धी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. वसईतील कोरोनाग्रस्त रुग्णाचा हा दुसरा बळी आहे.

अमेरिकेतून परतलेल्या व्यक्तिचा साताऱ्यात मृत्यू

दरम्यान, एका ६३ वर्षीय रुग्णाचा साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. विशेष म्हणजे या व्यक्तिचा १४ व्या दिवशीचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं होतं. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.