मुंबई: उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते सोमवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी आठवले यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. पण ते पंतप्रधान होणे अशक्य आहे. पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण देशात पक्ष असावा लागतो. महाराष्ट्रातील १८ खासदारांच्या जीवावर देशाचा पंतप्रधान होणे अशक्य आहे.
संजय राऊत म्हणतात, स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात असलं तरी....
पंतप्रधान होण्याची केवळ इच्छा असून चालत नाही, त्यासाठी तेवढी ताकदही लागते. उद्धव ठाकरे यांच्यात ती ताकद नाही, असे परखड मत रामदास आठवले यांनी मांडले. त्यामुळे आता यावर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रामदास आठवले सोमवारी नवी मुंबईतील वाघवली गावात असणाऱ्या बौद्ध लेण्यांची पाहणी करण्यासाठी आले होते. याठिकाणी विकास प्रकल्पासाठी सिडकोमार्फत बौद्ध लेणी जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. या पार्श्वभूमीवर आज रामदास आठवले यांनी बौद्ध लेण्यांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
'राममंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार नाही'
बौद्ध लेण्यांची पाहणी करण्यासाठी आलेल्या रामदास आठवले यांना अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा रामदास आठवले यांनी म्हटले की, राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार नाही. मी राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला जाणार नाही. त्याऐवजी अयोध्येत बौद्ध मंदिर बांधण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे रामदास आठवले यांनी सांगितले.