मंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानावरून त्यांचे अभिनंदन करत शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला वाकुल्या दावल्या आहेत. नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. गरीब त्यात भरडले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेना हा भाजप प्रणीत एनडीएचा घटक पक्ष. त्यामुळे केंद्रात असलेल्या भाजप सरकारमध्ये शिवसेनाही सहभागी आहे. त्याचबरोबर राज्यातही शिवसेनेचा सत्तासहभाग आहे. सत्तेत असलेल्या पक्षाने स्वपक्षावरच शरसंधान साधवे फारसे घडत नाही. पण, शिवसेना-भाजप सरकार बाबत हे घडते आहे. सत्तेत सहभागी झाल्याच्या दिवसापासून अशी एकही संधी शिवसेना सोडत नाही. ज्यावरून सरकारला लक्ष करता येईल. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनातूनही शिवसेना नियमीतपणे व्यक्त होत असते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध. नोटबंदीच्या काळात सर्वसामान्यांना त्रास झाला पण, श्रीमंतावर पडत असलेल्या धाडींमुळे ते खूश होते, असे विधान गडकरी यांनी नुकतेच केले. याच विधानावरून शिवसेनेने मोदी सरकारला लक्ष केले आहे. गडकरींचे अभिनंदन या मथळ्याखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दै. सामनात एक लेख लिहीला आहे. यात, 'नोटाबंदीमुळे श्रीमंतांचे अजिबात नुकसान झाले नाही. काळा पैसा पांढरा करण्याचाच तो एक डाव होता व त्यात काही मोजक्या धनाढ्य मंडळींची कशी चांदी झाली व त्यातून काही मंडळींच्या संपत्तीची कशी भरभराट झाली हे आता उघड झाले आहे. नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. गरीब त्यात भरडले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत. आम्ही परखड गडकरींचे अभिनंदन करीत आहोत', असे ठाकरे यांनी म्हटले आहे.