बॉलिवूड बिगीजचे भवितव्य पणाला

Updated: Nov 12, 2011, 11:16 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

शाहरुख खानच्या ‘रा-वन’ आणि रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ नंतर अनेक मोठ्या सिनेमांच्या प्रदर्शनासाठी बॉलिवूड सज्ज झालं आहे. ‘डर्टी पिक्चर’, ‘डॉन 2’ आणि ‘देसी बॉईज’ हे बिग बजेट सिनेमे प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. मेगा बजेट ‘रा-वन’ नंतर ‘डॉन 2’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करुन दाखवली तर आपण किंग ऑफ बॉलिवूड असल्याचं शाहरुख खान निर्विवादपणे सिध्द करु शकेल.

‘डॉन 2’ हा २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘डॉन:द चेसिंग बिगिन्स अगेन’चा सिक्वेल आहे. फरहान अख्तरने २००६ साली दिग्दर्शित केलेला डॉन हा अमिताभच्या १९७८ सालच्या मेगा हीट ‘डॉन’चा रिमेक होता. फरहानचा सिकवेल डॉन 2 २३ डिसेंबरला 2 D आणि 3 D मध्ये रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिकवेलमध्ये लारा दत्ता आणि प्रियांका चोप्रा लिड रोलमध्ये आहेत.

एकेकाळी दाक्षिणात्य सेक्स बॉम्ब म्हणून प्रसिध्द असलेल्या सिल्क स्मिथाच्या जीवनावरच्या ‘डर्टी पिक्चर’मध्ये विद्या बालन प्रमुख भूमिकेत आहे आणि मिलन लुथ्रियाने दिग्दर्शन केलं आहे. ‘पतियाळा हाऊस’, ‘तिस मार खान’, ‘थँक यू’ आणि स्वत:ची निर्मिती असलेल्या ‘स्पिडी सिंग्ज’ हे चार सिनेमे लागोपाठ बॉक्स ऑफिसवर आपटल्यामुळे अक्षर कुमारच्या सर्व आशा २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘देसी बॉईज’वर आहेत. ‘देसी बॉईज’ मध्ये चित्रंगदा सिंग आणि दिपीक पदुकोण प्रमुख भूमिकेत आहेत. सैफ अली खान आणि करिना कपूरचा एजंट विनोद ९ डिसेंबरला रिलीज होणार आहे.