झी सिने ऍवार्डसची सुरवात १९९८ झाली आणि त्यानंतरच्या काळात भारतीय सिनेसृष्टीत या ऍवार्डनी स्वत:चे असं एक स्थान निर्माण केलं. झी सिने ऍवार्डसच्या सोहळ्याला सिनेसृष्टीतले दिग्गज त्यामुळेच आवर्जून हजेरी लावतात. बॉलिवूडमध्ये झी सिने ऍवार्डस प्रतिष्ठेची मानण्यात येतात.
झी एन्टरटेनमेंट एन्टरप्राईझेस लिमिटेड म्हणजेच झीलने झी सिने ऍवार्डस २०१२ सालचा सोहळा मकावच्या विनेशियनमध्ये २१ जानेवारी २०१२ रोजी आयोजीत केला आहे. झी सिने ऍवार्डसच्या माध्यमातून सिनेमातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा सन्मान तसंच दर्शकांच्या निवडीचे खरेखुरे प्रतिबिंब त्यात दिसून येतं. झी सिने ऍवार्डसच्या सोहळ्याचे प्रक्षेपण ५ फेब्रुवारी २०१२ रोजी करण्यात येणार आहे.
झी सिने ऍवार्डसच्या सोहळ्याच्या निवेदनाची जबाबदारी एकापेक्षा एक दिग्गजांनी आजवर सांभाळली आहे. यंदा सैफ-करिना किंवा रणवीर-अनुष्का हॉस्ट असतील याबाबत बरीच उत्सुकता होती. पण यंदा किंग खान आणि प्रियांका चोप्रा हॉस्ट असणार आहेत. झी एन्टरटेनमेंटचे पुनीत गोयंका म्हणाले की शाहरुक खानसोबत आमचा दीर्घ काळाचा ऋणानुबंध आहे आणि आजवरच्या १३ समारंभांमध्ये त्याचा सहभाग राहिला आहे.
गेल्या १३ वर्षात दुबई, लंडन, मॉरेशिस, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये झी सिने ऍवार्डसच्या सोहळ्याच्या शानदार आयोजनाने ठसा उमटवला आहे. मागच्या वर्षीचा सिंगापूर येथील मरीना बे सँडस येथील सोहळाही रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल.