देशात आणि परदेशातही लोकांचा अभूतपूर्व सहभाग आणि पाठिंबा लाभलेलं अण्णा हजारेंचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन ही २०११ सालातील टॉप टेन न्यूज स्टोरी असल्याचं प्रख्यात मासिक टाइमने म्हटलं आहे. अरब देशातील लोकशाही उठाव आणि ओसामा बिन लादेनचा खातमा या न्यूज स्टोरी या यादीत समावेश आहे. टाइम मासिकाने २०११ सालातील विविध क्षेत्रातील टॉप टेन घडामोडींच्या ५४ यादांचे संकलन केलं आहे त्यात राजकारण, मनोरंजन, व्यवसाय, क्रिडा आणि पॉप कल्चर यांचा समावेश आहे.
अण्णा हजारेंच्या उपोषणा संदर्भात उल्लेख करताना टाइमने म्हटलं आहे की वर्षभरात जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली पण त्यापैकी सर्वात लक्षणीय घटना भारतात घडली. देशातील आघाडी सरकारमधील अनेक जण भ्रष्टाचाराच्या देशातील महत्वाच्या शहरांमध्ये अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवणारी मोठ्या प्रमाणावर निर्दशने झाली. त्यामुळे सरकारवर पंतप्रधानांनसह सर्व राजकारण्यांविरुध्द भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्वायत्त लोकपालच्या निर्मिती साठी दबाव वाढला. हजारेंच्या आंदोलनाला लाभलेले जनतेचे समर्थन देशातील मध्यमवर्गाच्या आशा आकांक्षा आणि भ्रष्टाचारा विरुध्द असणारी चीड, संतापाचे प्रतिबिंब असल्याचंही टाइमने म्हटलं आहे.
अरब देशातील लोकशाहीसाठीचा लढा तसेच अमेरिकन कमांडोनी अबोटाबादमध्ये केलेला ओसामा बिन लादेनचा खातमा, आफ्रिकेतील दुष्काळ, लिबयाचा हुकुमशहा मुआम्मार गडाफीचा पाडाव आणि युरोपवर कोसळलेलं आर्थिक आरिष्ट या २०११ सालातील टॉप टेन स्टोरी आहेत. सत्य साई बाबांचे महानिर्वाण ही देखील २०११ सालातील धार्मिक प्रवर्गातील टॉप टेन स्टोरी असल्याचं टाइमने नमुद केलं आहे.