www.24taas.com, नवी दिल्ली
जुलै महिन्यात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. काँग्रेसनं आपल्याच पक्षातील उमेदवारासाठी जोरदार फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसकडून संरक्षण मंत्री ए के एन्टोनी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तर माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या अराजकीय व्यक्तीच्या उमेदवारीसाठी तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि अण्णाद्रमुक तसंच भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसला आव्हान देण्यासाठी एक भक्कम आघाडी उभा राहण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. त्यात पवारांनीही अराजकीय व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान व्हावा असं वक्तव्य केल्यानं युपीएमध्ये संभ्रमाचंच वातावरण निर्माण होणार आहे.
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे पुन्हा एकदा देशाचे राष्ट्रपती होऊ शकतात. ते राष्ट्रपती पदाचे तगडे उमेदवार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सरकारजवळ पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यानां इतरांच्या मतानुसार राष्ट्रपती पदासाठी उमेदवार द्यावा लागण्याची शक्यता आहे. अनेक राजकिय पक्षांचे असे मत आहे की, एखादा अराजनैतिक उमेदवार हा राष्ट्रपती असावा त्यामुळे एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपतीपदासाठी दावेदार मानले जातात.