www.24taas.com, नवी दिल्ली
गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या बेबी फलकने अखेर मृत्यूसमोर हात टेकले आणि जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने तिने गुरुवारी रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली.
तिच्यावर आणखी उपचार केल्यास ती यातून बाहेर पडेल, असा दावा काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी व्यक्त केला होता. प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिचा कृत्रिम श्वासोच्छवासही काढून टाकण्यात आला होता. मात्र, काल रात्री अचानकपणे हृदयविकाराचा झटका बसल्याने तिचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.
१८ जानेवारी रोजी एका तरुणीने तिला दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी फलक अतिशय गंभीर जखमी होती. तिच्या शरिरावर चावण्याच्या खुणा होत्या. तसेच, तिच्या डोक्यालाही मार लागला होता. एकीकडे फलकवर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच दुसरीकडे दिल्ली पोलिस या प्रकरणाची कसून तपासणी करत होते. त्यातूनच मानवी तस्करी करणारी मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली होती.
तसेच, फलकच्या आई- वडिलांचाही शोध लावण्यात आला होता. फलकला रुग्णालयात आणणारी तरुणी सध्या बालसुधार गृहात असून या प्रकरणी मुख्य आरोपी राजकुमारसहित नऊ जण अटकेत आहेत.