www.24taas.com, नांदेड
संत म्हटले की फक्त आत्मा, परमात्मा, देव, धर्म याच गोष्टी येऊन आदळतात. पण अध्यात्मापेक्षा आजच्या काळात त्यांचा सामाजिक विचारच अधिक महत्त्वाचा आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी सोमवारी संध्याकाळी नांदेड येथे केले. ‘रिंगण’ या पहिल्या आषाढी अंकाच्या www.ringan.in या वेबसाईटचे प्रकाशन त्यांच्या हस्ते एका छोटेखानी पण विविध विचारांचा समन्वय झालेल्या कार्यक्रमात पार पडले.
‘रिंगण’ वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकाच्या इंटरनेट आवृत्तीचे प्रकाशन नामदेव पुण्यतिथीच्या मुहूर्तावर मराठी-पंजाबी संस्कृतीचे समन्वय केंद्र असणा-या नांदेड येथे आयोजित करण्याचे औचित्य साधण्यात आले होते. संतांचे योगदान मोठेच आहे. संत नामदेवांनी देशभर फिरून पिचलेल्यांना बळ दिले. पण आज त्यांचे नाव घेणारे घराच्याही बाहेर पडण्यात उत्सूक नसतात. भाषा प्रांतांच्या आजच्या भांडणात नामदेवांचे राष्ट्रीय स्वरूपाचे कार्य अधिक महत्त्वाचे ठरते, अशा शब्दांत त्यांनी नामदेवांच्या मोठेपणाची मीमांसा केली. आज नामदेव असते तर त्यांनी जागतिक पातळीवर विचारांच्या प्रसारासाठी इंटरनेटसारख्या माध्यमांचा वापर केला असता. त्यामुळे ‘रिंगण’ इंटरनेटवर येणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
संत नामदेवांनी उत्तर भारतात संतपरंपरेची सुरुवात केली, असे सांगत प्रा. रंगनाथ तिवारी यांनी उत्तर भारतावरचा नामदेवांचा प्रभाव सविस्तर मांडला. ‘रिंगण’मध्ये नामदेवांच्या अनेक पैलूंवर अभ्यासपूर्ण लेख असून कोणताही महत्त्वाचा मुद्दा सुटलेला नाही, असे प्रमाणपत्रच त्यांनी दिले. तर प्रा. डॉ. जगदीश कदम यांनी संशोधनाच्या दृष्टीने ‘रिंगण’च्या अंकाला फार मोल असल्याचे सांगितले. आजही परिवर्तनाच्या चळवळीत नामदेवांनी घालून दिलेला संयमित बंडखोरीचा धडा महत्त्वाचा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. तर प्राचार्य हरमहेंद्र सिंग यांनी अस्खलित मराठीतील भाषणात गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या जीवनातील प्रसंगांचा महिमा कसा वर्णन केला आहे, हे समजावून सांगितले. आज सर्वधर्मसमन्वयाचीच नाही, तर सर्वधर्मस्वीकाराची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी नामदेवांच्या संदर्भात मांडले. ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी वेबसाईट सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.