www.24taas.com, ठाणे
काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांत बाचाबाची आणि मारहाण झाली आहे. या गदारोळात अज्ञात व्यक्ती समजून शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याचं समोर आल्यानंतर, सत्ताधारी बॅकफूटवर गेले. 16 स्थायी समिती सदस्यांची घाईघाईत घोषणा करुन महासभा आटोपती घेण्यात आली.
शिवसेना आणि काँग्रेसच्या संगनमतानं विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांची निवड झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त असतानाही ही निवड झालीच कशी असा आक्षेपही घेण्यात आलाय. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कोर्टातही जाणार आहे. आज महासभेचं कामकाजाला काळ्या फिती लावून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपस्थिती लावली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपद, विरोधी पक्षनेतेपद आणि मागील महासभा रद्द का केली, यावरुन राष्ट्रवादीनं सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापौरांना घेरावही घालण्यात आला. यानंतर पहिल्यांदा कामकाज तहकूब करण्यात आलं.
दुस-यावेळी कामकाज सुरु झाल्यानंतर आक्रमक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांत बाचाबाची झाली, त्याचं पर्यावसान मारहाणीत झालं.. यावेळी महापौरांच्या मंचावर उपस्थित असलेल्या एका पालिका अधिका-याला अज्ञात व्यक्ती समजून संतप्त शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर जोरदार मारहाण केली. ही व्यक्ती पालिकेचा सहाय्यक आयुक्त असल्याचं समोर आल्यानंतर महासभा तहकूब करण्यात आली.