www.24taas.com, रत्नागिरी
दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर महाकाय मासा मृत अवस्थेत सापडला. हा देव मासा असण्याची शक्यता आहे. या माशाची लांबी १५ म्हणजेच सुमारे ४२ फूट तर त्याची गोलाई १६५ सेमी आहे. या माशाला पाहण्यासाठी लाडघर समुद्र किनाऱ्यावर गर्दी उसळली होती.
लाडघर येथील दत्तमंदिरापासून जवळच्याच किनाऱ्यावर मृत मासा आढळून आला आहे. हा मासा सकाळी एका गुराख्याला दिसला. त्याची माहिती पोलीस आणि वनविभागाला दिली. या माशाच्या मृत्यचे नेमके कारण अद्यापही समजलेले नाही. एखाद्या मोठ्या जहाजाच्या पंख्यामुळे जखमी होऊन किंवा एखादा आजार होऊन अथवा वयोमान झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे.
देवमासे साधारणत: कोकण किनारपट्टीजवळ दिसून येत नाहीत. अत्यंत खोल पाण्यात राहणारा हा मासा खाद्याच्या शोधात अथवा वाट चुकून उथळ समुद्रात आला असावा, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. . आजवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर २० ते ३० फूटी मासे मृत अवस्थेत लागले आहेत. तालुक्यातील हर्णै, बुरोंडी तसेच लाडघर येथेही यापूर्वी असे मोठे मासे किनारी लागले होते. मात्र तब्बल ४२ फूट लांबीचा मासा समुद्रकिनारी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हा मासा सडत असल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे; मात्रतरीही कुतूहलापोटी अनेकजण या किनाऱ्याकडे धाव घेत आहेत. या माशाबाबत कोणतीही शास्त्रीय माहिती मिळू शकली नाही. परंतु त्याच्या आकारमानामुळे हा देवमासाच (व्हेल) असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. उपविभागीय वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक माहिती घेण्यात येत आहे. मृतावस्थेत असलेल्या या माशाच्या पंचनाम्याचे काम सध्या सुरू ओह. दापोलीचे तहसीलदार युवराज बांगर यांनी लाडघर या ठिकाणी भेट दिली.