मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
नाशिकमध्ये पाणीकपातीच्या मुद्यावरून राजकारण सुरू झालंय. नागरिकांना पाणी मिळण्यासाठी पालिकेनं ठोस भूमिका घ्यावी यासाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर जुलैपर्यंत टिकेल इतका पाणीसाठी असल्याचा दावा महापौरांनी केलाय.
पालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या मनसेसमोर पाण्याचा प्रश्न उपस्थित झालाय. या मुद्यावरून मनसेची कोडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवलाय. गंगापूर धरणातलं पाणी नगर जिल्ह्यानं पळवल्यानं शहराला पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.
जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळं संकट निर्माण झाल्यानं मनसेनं ठोस भूमिका घेण्याची मागणी विरोधकांनी केलीय. तर जिल्ह्यात एकूण २ हजार ६४२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून शहरासाठी १ हजार ५९३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असल्याचं महापौरांनी सांगितलंय. पालकमंत्र्यांनीही पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालून तातडीनं आढावा बैठक बोलावलीय. रविवारच्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी काय भूमिका घेतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय.