www.24taas.com, पुणे
नेहमीच परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी आज त्यांच्या व्यसनी सहकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्वच्छता अभियानाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. य़ा कार्यक्रमात चर्चेत राहिले ते अजित पवारांचे स्वच्छतेबद्दलचे सल्ले. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत पुणे महापालिकेनं यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियान हाती घेतलं आहे.
या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभागांना पारितोषिकं देण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेच्या या अभियानाचं अजित पवारांनी कौतुक केलं. मात्र त्याचवेळी स्वच्छता आणि व्यसनाधीनतेच्या विषयालाही त्यांनी खास आपल्या शैलीत हात घातला. आणि व्यसनी सहकाऱ्यांना कानपिचक्याही दिल्या. पुणे महापालिकेतले अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनाही स्वच्छतेचा मंत्र अजित पवारांनी दिला.
शहर स्वच्छतेबरोबरच पाणी बचत, वीजेची टंचाई, मेट्रो रिंग रोड अशा विविध विषयांमध्ये राजकारण बाजूला ठेवून विकास करण्याचा सल्ला अजितदादांनी दिला आहे. आता अजित पवारांचं हे मार्गदर्शन कुणाकुणाच्या आणि कसं पचनी पडणार ते पहावं लागेल.