कोल्हापूरमध्येही अफूची शेती

कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यात सापडलेल्या अफू शेती प्रकरणी एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शाहूवाडीतल्या शिवारे गावातील शेतकऱ्याच्या शेतात सापडलेल्या अफूच्या झाडांची किंमत दोन लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Mar 14, 2012, 08:30 AM IST

www.24taas.com, कोल्हापूर

 

कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यात सापडलेल्या अफू शेती प्रकरणी एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे.  शाहूवाडीतल्या शिवारे गावातील या शेतकऱ्याच्या शेतात सापडलेल्या अफूच्या झाडांची किंमत दोन लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. या शेताचा मूळ मालक राजाराम गुळवणी नावाचा व्यक्ती असून शिवाजी पाचील कूळ म्हणून शेती करत आहेत. खसखशीसाठी पीक घेतल्याचे या शेतकऱ्याकडून सांगितले जात असलं तरी त्याची विल्हेवाट कशी लावली जात होती याचा तपास पोलीस करत आहेत.

 

राज्यभरात फोफावलेल्या अफू शेती प्रकरणात आता पोलिसांवरच आरोप होऊ लागले आहेत.  शेतकऱ्यांनी पोलिसांना हप्ते दिले नाहीत म्हणूनच त्यांनी अफू शेतीविरोधात कारवाई सुरु केल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला होता. वनमंत्री पतंगराव कदम यांनी पोलीस आणि गृहखात्याला टार्गेट केलं असताना आता शेतकरी संघटनेनं केलेल्या या आरोपामुळे पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

 

अतिरिक्त अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकले होते.  कारवाई सुरु आहे. गुन्हेगारांना झोडण्याची फोडण्याची भाषा करणाऱ्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अफूचे म्हणजेच विषाचे सौदागर खुलेआम व्यवहार करत असल्याचं उघडकीस आलं होतं. ‘ झी २४तास’नं बीडमधील अफूच्या शेतीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर सांगली आणि पुण्यातही अफूच्या लागवडीचं प्रकरण उघडकीस आलं होतं.