राष्ट्रवादीचा 'एलेव्हेटेड मेट्रो'ला ग्रीन सिग्नल

राष्ट्रवादी काँग्रेसनं एलिव्हेटेड मेट्रोला ग्रीन सिग्नल दिलाय. मेट्रो एलिव्हेटेड हवी की भुयारी, यावर राष्ट्रवादीनं अनेक कोलांटउड्या मारल्या. त्यामुळे पुण्याची मेट्रो राष्ट्रवादीच्या स्टेशनवर अडकली होती.

Updated: Apr 17, 2012, 08:52 PM IST

नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे

 

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं एलिव्हेटेड मेट्रोला ग्रीन सिग्नल दिलाय. मेट्रो एलिव्हेटेड हवी की भुयारी, यावर राष्ट्रवादीनं अनेक कोलांटउड्या मारल्या. त्यामुळे पुण्याची मेट्रो राष्ट्रवादीच्या स्टेशनवर अडकली होती. आता राष्ट्रवादीचा विरोध संपला असला तरी पुणे मेट्रोसमोर अजूनही काही रेड सिग्नल बाकी आहेत.

 

पुण्याची मेट्रो गेल्या सात वर्षांमध्ये वाद आणि चर्चांमधून पुढे सरकलेली नाही. मेट्रो भुयारी असावी की एलिव्हेटेड याचभोवती हा वाद फिरतोय. सत्ताधारी राष्ट्रवादीनं आधी एलिव्हेटेड मेट्रोला पाठिंबा दिला. मग यु टर्न घेत भुयारीच मेट्रो हवी अशी मागणी केली. शब्दाचे पक्के म्हणून ओळखले जाणारे अजितदादा मेट्रोच्या बाबतीत मात्र ठाम राहिले नाहीत. आता त्यांनी पुन्हा एलिव्हेटेड मेट्रोचा पुरस्कार केलाय.

 

पुणे मेट्रोचा प्रवास सुरू झाला तो 2005 पासून. 2005 मध्ये पुणे महापालिकेनं दिल्ली मेट्रोची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. दिल्ली मेट्रोनं 2007 साली DPR म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट सादर  केला. 2010 फेब्रुवारीमध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं DPR संमत करुन राज्य सरकारकडे पाठवला. 3 वर्षांपासून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे. आता राष्ट्रवादीनं भूमिका बदलत मेट्रोसाठी पुढाकार घेतलाय. मात्र अजूनही अडथळ्याची काही स्टेशन्स बाकी आहेत.

 

गेल्या सात वर्षांत मेट्रो प्रस्ताव, चर्चा आणि वाद यापुढे गेलेली नाही. बंगळुरु, जयपूरसारखी शहरं पुढे गेली. मेट्रोच्या बाबतीत अजितदादांचं नेतृत्व कमी पडतंय की पुणेरी वाद नडतोय, हे आतातरी सांगणं कठीण आहे.