थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला

थंडीचा जोर आता सा-या महाराष्ट्रात दिसून येतोय. गेल्या दोन दिवसापासून थंडीचा जोर जास्तच दिसून येतोय. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागही या थंडीच्या तडाख्यात आलाय. मुंबईच तापमान ११.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होतं.

Updated: Jan 10, 2012, 09:59 AM IST

www.24taas.com , मुंबई

 

थंडीचा जोर आता सा-या महाराष्ट्रात दिसून येतोय. गेल्या दोन दिवसापासून थंडीचा जोर जास्तच दिसून येतोय. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागही या थंडीच्या तडाख्यात आलाय.

 

 

विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात थंडीचा कडाका जास्त आहे. तर कोकणातही गेले दोन दिवस पारा सहा अंशाच्या आसपास गेलाय. नववर्षाच्या सुरुवातीला थंडीचा जोर काहीसा ओसरला होता. गेल्या दोन दिवसांपासून मात्र संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट आलीय.

 

 

राज्यासह यंदा मुंबईलाही थंडीची हुडहुडी भरलीय. गेल्या आठवड्यापासून मुंबईच्या तापमानात कमालीची घरसण झाली असून पारा अकरा अंश सेल्सिअसपर्यंत घसरलाय. पुढील काही दिवसात हा पारा १० अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. मात्र कधी नव्हे तो बोच-या थंडीचा अनुभव सध्या मुंबईकरांना मिळतोय. विशेष म्हणजे सोमवारी मुंबईकरांनी सर्वात थंड दिवस अनुभवला.

 

 

सांताक्रुझ वेधशाळेच्या नोंदीप्रमाणे सोमवारी मुंबईच तापमान ११.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होतं.  सर्वांत कमी तापमान नाशिक जिल्हात ४.८  तर शहरात ६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले; तर पुण्यात यंदाच्या हंगामातील नीचांकी नोंद ७.२  इतकी करण्यात आली. कोकणात दोपोलीत ७ तापमानाची नोंद झाली आहे.

 

 

उत्तर भारतात कडाक्‍याची थंडी असून जम्मू-काश्‍मीर, पंजाब, तसेच पश्‍चिम मध्य प्रदेशात थंडीची जोरदार लाट आली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्‍मीरवर असलेल्या पश्‍चिमी वाऱ्यांमधील चक्रीय स्थिती आता पूर्वेकडे सरकली आहे. या दोन्ही घटकांमुळे थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी दिली.