धोनी टीम आघाडी कायम राखणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरी वन-डे मॅच आज हम्बान्टोटामध्ये रंगणार आहे. विजयी सलामी दिल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावलाय. तर पहिल्याच मॅचमधील पराभवामुळे लंकन टीमला सीरिजमध्ये परतण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार आहे.

Updated: Jul 24, 2012, 08:41 AM IST

www.24taas.com, हम्बान्टोटा

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरी वन-डे मॅच आज हम्बान्टोटामध्ये रंगणार आहे. विजयी सलामी दिल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावलाय. तर पहिल्याच मॅचमधील पराभवामुळे लंकन टीमला सीरिजमध्ये परतण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार आहे.

 

लाँग ब्रेकरनंतर खेळणाऱ्या टीम इंडियानं विजयी सलामी देत नव्या सीझनची सुरुवात जबरदस्त केली आणि पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये १-० नं आघाडी घेतली. आता दुसऱ्या वन-डेमध्येही श्रीलंकेला मात देण्यासाठी टीम इंडिया आतूर आहे. पहिल्या मॅचमध्ये भारताची बॅटिंग आणि बॉलिंग चांगली झाली. मात्र, टीम इंडियाची फिल्डिंग या मॅचमध्ये अतिशय सुमार झाली. त्यामुळे दुसऱ्या मॅचमध्ये भारताला आपल्या फिल्डिंगमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवागच्या तडाखेबंद खेळीमुळे भारताला हा विजय साकारता आला.

 

गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांना अजूनही सूर सापडलेला नाही आणि ही बाब कॅप्टन धोनीच्या चिंतेत भर पाडणारीच आहे. बॉलर्सनी समाधानकारक कामगिरी केलीय. मात्र, लंकन बॅट्समनना रोखण्यासाठी त्यांनाही चांगलेच कष्ट करावे लागले. झहीर खान, उमेश यादव आणि इरफान पठाणवर फास्ट बॉलिंगची मदार असेल. आर. अश्विन आणि प्रज्ञान ओझावर स्पिन बॉलिंगची जबाबदारी असेल तर दुसरीकडे पहिल्याच मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानं श्रीलंकेची टीम सीरिजमधील पहिला विजय मिळवण्यासाठी आतूर असेल. कुमार संगकारानं सेंच्युरी झळकावत भारताला चांगलाच दणका दिला होता. मात्र, त्याची सेंच्युरी पहिल्या मॅचमध्ये व्यर्थ ठरली होती. त्यामुळे भारताला त्याच्यापासून सावध रहावं लागणार आहे. थिसारा परेरानं हम्बानटोटा वन-डेत ऑलराऊंड कामगिरी केली होती. त्यामुळे तो दुसऱ्या मॅचमध्येही याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दोन्ही टीम्स तुल्यबळ असल्यानं क्रिकेटप्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणी ठरणार आहे.

 

.