झी 24 तास वेब टीम, मुबंई
घटस्थापनेचा शुभमुहूर्तावर क्रिकेटचा देवाने आपल्या राजमहालात आज प्रवेश केला. लाखो क्रिकेटप्रेमींचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज आपल्या आलिशान बंगल्यात राहण्यासाठी आला आहे. पेरी क्रॉस रोडवरील या नव्या बंगल्याची सचिनने विधीवत पूजाही केली.
[caption id="attachment_1161" align="alignleft" width="300" caption="सचिनचा स्वप्नमहाल"][/caption]
मुंबईत आपला एक बंगला असावा असं मास्टर ब्लास्टरचं फार पूर्वीपासूनच स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज सत्यात उतरलं आहे. आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सचिनने चार वर्षांपूर्वीच तयारी केली होती. आज सचिनचा बंगला ज्या ठिकाणी उभा आहे तिथं 2007 सालापर्यंत दोराब व्हिला नावाचा बंगला होता. तो बंगला सचिनने 2007 साली खरेदी केला. त्यासाठी त्याने तब्बल 39 कोटी रुपये मोजले.
1920 साली दोराब व्हिला बांधण्यात आला होता. तो व्हिला एका पारशी कुटुंबाच्या मालकीचा होता. ही इमारत मोडकळीस आली होती. सचिनने दोराब व्हिला खरेदी केल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी ती बाब उघड झाली. पेरी क्रॉसरोडवर बंगल्याचं बांधकाम सुरु झाल्यानंतर तो बंगला सचिनचा असल्याचं सर्वांना समजलं. हा बंगला सचिनसाठी खास आहे कारण बंगल्यासाठी जमिन निवडण्यापासून ते त्याचं डिझाईन तयार करण्यापर्यंत सगळ्याच बाबी सचिनने आपल्या मनाप्रमाणे तयार करुन घेतल्या आहेत. जवळपास 10 हजार स्क्वेअर फूटमध्ये सचिनच्या नव्या बंगल्याचं बांधकाम करण्यात आले आहे.
[caption id="attachment_1181" align="alignleft" width="320" caption="घटस्थापनेचा शुभमुहूर्तावर क्रिकेटचा देवाने आपल्या राजमहालात आज प्रवेश केला."][/caption]
मुंबईत आपलं स्वत:चं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, तर मुंबईकर सचिन तरी याला कसा अपवाद असेल. या बंगल्यासाठी सचिनने आपल्या क्रिकेटच्या बिझी शेड्यूल्डमधून खास वेळ काढला होता. यावरुन हा बंगला सचिनसाठी किती महत्वाचा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सचिन लवकरच आपल्या बंगल्यात राहण्यासाठी आल्याने या परिसरात राहणारे लोकही मोठ्या खुशीत आहेत. क्रिकेटमध्ये ज्याला देवाची उपाधी देण्यात आली तो मास्टर ब्लास्टर त्यांच्या परिसरात राहण्यासाठी येणार आहे. सचिन धार्मिकवृत्तीचा असल्यामुळं त्याने नुकतेच या बंगल्याची विधीवत पूजा केली.