KKRने करून दाखवलं, लढून दाखवलं, जिंकूनही दाखवलं

आयपीएलसीझन ५ मध्ये फायनल मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सनं बाजी मारलीय. ५ गडी राखून कोलकातानं हा विजय मिळवला.

Updated: May 28, 2012, 08:48 AM IST

 www.24taas.com, चेन्नई 

 

आयपीएलसीझन ५ मध्ये फायनल मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सनं बाजी मारलीय. ५ गडी राखून कोलकातानं हा विजय मिळवला.

 

आपल्या घरच्या मैदानावर टॉस जिंकून चेन्नईच्या महेंद्रसिंग धोनीनं पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. २० ओव्हर्समध्ये ३ बाद १९० रन्स देऊन चेन्नईनं कोलकाताला ‘गंभीर’ व्हायला लावलं. सुरेश रैनानं ७३, ‘बर्थडे बॉय’ मायकल हसीनं ५४, मुरली विजयनं ४२ तर कॅप्टन धोनीनं नॉट आऊट १४ रन्स दिले. फायनल मॅचमध्येही चेन्नईनं आक्रमकपणे अर्धशतकी सलामी दिली. पहिल्या ६ ओव्हर्समध्ये चेन्नईनं ५४ रन्सवर मजल मारली. आयपीएलच्या इतिहासात आपल्या जन्मदिवशी अर्धशतक बनवणारा मायकल हसी पहिला खेळाडू ठरलाय.

 

चेन्नईच्या १९१ रन्सच्या तगड्या आव्हानाला उत्तर देताना कोलकाताला पहिला झटका बसला तो गौतम गंभीरचा विकेट गेल्यानं. पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन गंभीर आऊट झाला आणि त्यानंतर मैदानात उतरला जॅक कॅलीस. कॅलीस आणि सलामीवीर मनविंदर बिस्ला यांनी तुफानी खेळी करत आपल्या टीमला पुन्हा धीर दिला. ८९ रन्सकरून बिस्ला आऊट झाला. चेन्नईच्या बॉलर्सला मात्र एव्हाना घाम फुटला होता. बिस्लानं २७ बॉल्समध्ये ५ फोर आणि ३ सिक्स ठोकून बॉलर्सची धुलाई केली होती. कॅलीसनं त्याला उत्तम साथ दिली. कॅलीस ६९ रन्स, शकीब हसन ११ रन्स, शुक्ला ३, युसुफ पठान १ तर तिवारीच्या  ९ रन्सच्या साथीनं कोलकातानं विजयाकडे आगेकूच केली.

 

आयपीएल सीझन ५ मधली आजच्या फायनल मॅचची सगळ्यांनाच उत्सुकता होती. चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन गौतम गंभीर या दोघांसाठी ही मॅच महत्त्वाची होती, याच वादच नाही. आयपीएलमध्ये चौथ्यांदा फायनलमध्ये धडक मारणारी आणि आयपीएलचे दोन सीझन घशात घालणारी चेन्नई यंदाही हॅट्ट्रीक करणार का, की ‘गंभीर’ टीम पहिल्यांदाच आयपीएल जिंकून आपल्याला सिद्ध करणार? याकडे सगळ्याच क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून होतं.

 

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्र सिंग धोनी (कॅप्टन), मुरली विजय, मायकल हसी, सुरेश रैना, ड्वेन ब्रावो, एल्बी मोर्कल, रवींद्र जडेजा, सुब्रह्यण्यम बद्रीनाथ, रविचंद्रन अश्विन, बेन हिल्फेनहास आणि शादाब जकाती.

कोलकाता नाइट रायडर्स - गौतम गंभीर (कॅप्टन), मानविंदर बिस्ला, जॅक कॅलिस, युसुफ पठाण, शाकिब अल हसन, लक्ष्मीरतन शुक्ला, देवव्रत दास, रजत भाटिया, इक्बाल अब्दुल्ला, सुनील नरीन आणि ब्रेट ली