www.24taas.com, कोलकता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मंजूर करण्यात येणार असून अजित पवार यांनी एक धाडसी निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर भावनेच्या भरात इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजीनामे दिल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचनासंदर्भात श्वेतपत्रिका काढल्यामुळे हा वाद निर्माण झालेला नाही. सिंचनाची श्वेतपत्रिका काढावी, याचे अजित पवार यांनीही समर्थन केले होते. श्वेतपत्रिका काढून राज्यातील जनतेसमोर सत्य येत नाही, तोपर्यंत मी सत्तेत राहणार नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेचे मी समर्थन करतो. त्यांनी एक सहासी निर्णय घेतला असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या राजकारणात येणार नाही- सुप्रिया सुळे
राज्याच्या राजकारणात परतण्यास उत्सुक नसल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.
बारामतीच्या जनतेनं केंद्रासाठी आपल्याला निवडून दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच सरकारला कोणताही धोका नाही. अजित दादांच्या राजीनाम्यानंतर घडणाऱ्या घडामोडींमध्ये दबावतंत्राचा कुठलाही भाग नसल्याचं त्यांनी म्हटलंय. शुक्रवारपर्यंत राजीनामा प्रकरणावर नक्की तोडगा निघू शकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आता पुढे काय? या प्रश्नावर सगळ्या महाराष्ट्रभर वेगवेगळ्या स्थरांवर खल सुरू आहे. यामध्ये साहजिकच सुप्रिया सुळे यांचं नावही पुढे येतंय. यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
काँग्रेसचे वेट अँड वॉच
राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना राजीनामाप्रकरणी मौन बाळगण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारही अडचणीत आलं आहे. मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास काँग्रेस श्रेष्ठींनी नेत्यांना मनाई केली आहे. त्यामुळे काँग्रेस सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत आहे.
राजीनामा मागे घ्या- राष्ट्रवादी आमदार
‘अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागे घ्या’ अशी राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी मागणी केली आहे. अजितदादांच्या शक्तिप्रदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला आहे. पवारांनी आमदारांच्या भावना जाणून घ्यावात अशी विनंती अजित पवार समर्थक आमदारांनी केली.