www.24taas.com, झी मीडिया,पंढरपूर
पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.
आषाढी आणि कार्तिकीला विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. शिवाजी महाराजांच्या काळात हा मान महाराजांकडे होता. त्यानंतर महापूजेचा मान हा साता-याच्या गादी कडे सोपवण्यात आला. इंग्रजांच्या काळात प्रशासकीय अधिका-यांना हा मान मिळत असे. त्यानंतर स्वतंत्र भारतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हा मान आला. त्यानुसार आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा केली जाते तर कार्तीकीला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा केली जाते.
जालना जिल्ह्यातील जाफराबादचे नामदेवराव वैद्य आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरले. परंपरेनुसार आषाढीच्या पूजेचा मान मुख्यमंत्र्यांकडे असतो त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. विठ्ठलाच्या मुर्तीला स्नान घालण्यात आलं त्यानंतर मुर्तीवर अत्तर आणि वस्त्रालंकार चढवण्यात आलं. त्यानंतर विठ्ठलाला महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला आणि आरती करण्यात आली.
आषाढी एकादशीनिमित्त यंदा तब्बल दहा लाख वारकरी पंढरपूरात दाखल झालेत. विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी वारक-यांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्यात.. तासंतास रांगेत उभे राहून भावीक दर्शन घेताहेत.
महापूजेनंतर मंदिर समितीकडूम मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्याचं यावेळी ते बोलले. राज्यावर येणा-या आरिष्ठापासून लढण्याची ताकत पांडूरंगा आम्हाला दे असं साकडं यावेळी त्यांनी विठ्ठलाच्या चरणी घातलं...
यावेळी मानाचे वारकरी नामदेव वैद्य आणि त्यांच्या पत्नीचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे मानाच्या वारक-याला STकडून मोफत पास देण्यात आला. या पासवर त्यांना एका वर्षासाठी राज्यभर STतून मोफत प्रवास करता येणार आहे. नामदेव वैद्य आणि त्यांच्या पत्नी गंगूबाई वैद्या हे गेल्या २५ वर्षांपासून नित्यनेमाने पंढरपूरची वारी करतात. यंदा मानाच्या वारक-याचा मान त्यांना मिळालाय. ११ हजारांचा धनादेश देऊन यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.