हेमंत महाजन, माजी ब्रिगेडियर : पाकिस्तानने आपल्याविरुद्ध पुकारलेल्या छुप्या युद्धाचा आणखी एक प्रकार नेपाळमध्ये पकडलेल्या आयएसआय एजंटाकडून समोर आलेला आहे. देशाविषयीची संवेदनशील माहिती शत्रूपर्यंत जायला नको (सिक्युरिटी ऑफ इन्फर्मेशन), नागरिकांना दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त करणे (सबव्हर्शन) आणि राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान (सॅबोटाज) या तीन पातळ्यांवर पाकिस्तानी आयएसआय सध्या आपल्या देशाला धोका पोहोचवत आहे.
आंध्र प्रदेशमधील कुनेरूजवळ जगदलपूर–भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरुन घसरल्याने २६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.अपघाताच्या या घटनांमागे घातपाताची शक्यता व्यक्त होत असून पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि भारतातील नक्षलवादी संघटनांनी हातमिळवणी केली आहे. ज्या परिसरात हा अपघात झाला तो परिसरत नक्षलप्रभावित असून या परिसरात नक्षलवाद्यांनी शहीद दिवस साजरा करण्याचे आवाहन ही केले होते. रेल्वे रुळांत बिघाड घडवून हा अपघात घडवून आणण्यात आला असावा.
या रेल्वे मार्गावरून एक मालवाहतूक रेल्वे १० वाजून ५ मिनिटांनी गेली होती. १० वाजून ४० मिनिटांनी रेल्वे कर्मचाऱ्यांनी या मार्गाची तपासणी ही केली होती, त्यानंतर १० वाजून ५२ मिनिटांनी आणखी एक रेल्वे याचा मार्गावरून गेली. पण ११ वाजून १५ मिनिटांनी आलेल्या हिराखंड एक्सप्रेसला मात्र अपघात झाला. दोन्ही बाजुचे ट्रॅक ज्या पद्धतीने तुटले आहेत, तो प्रकार संशयास्पद आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघातात वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये कानपूरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात १४० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.डिसेंबरमध्ये सियालदाह – अजमेर एक्सप्रेसला अपघात झाला होता. यातील कानपूरमधील रेल्वे अपघातामागे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याची बिहार पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी कानपूर येथील दुर्घटना घडवल्याचे कबुली बिहार पोलिसांच्या ताब्यातील आरोपींनी दिला आहे. इंदौर पाटणा एक्सप्रेस आणि सियालदा अजमेर एक्सप्रेस या दोन रेल्वेच्या अपघातात उमाकांत पटेल, मोतीलाल पास्वान, मुकेश यादव या तिघांवरही रेल्वे रुळावर कुकर बॉम्ब ठेवल्याचा संशय आहे.
यापुर्वी नेपाळ पोलिसांनी आयएसआयचा हँडलर ब्रिज किशोर गिरी ,मुजाहिर अन्सारी यालाही ताब्यात घेतले. यावरून नेपाळ सीमा किती धोकादायक आहे याची गंभीरता आपल्याला समजून येईल. आत्तापर्यंत काश्मिरच्या सीमारेषेवरुन जितके दहशतवादी आत आले नसतील तेवढे दहशतवादी नेपाळ सीमेवरून घुसखोरी करत आहेत.कानपूरमधील रेल्वे अपघात पुर्वनियोजित कटाचा भाग होता. या अपघाताशी इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ही संबंधित आहे असे स्पष्ट आहे. या सर्व घटनाक्रमात शमशुल शुदा आघाडीवर होता. तो नेपाळमधील आपल्या एजंटच्या मार्फत बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढत होता. पैशाचे आमीष दाखवून दहशतवादी कृत्य करण्यास प्रवृत्त केले जायचे. याच पद्धतीने नेपाळमधून दोन आणि भारतातून ३ जणांना या कटात सामील केले होते. भारत नेपाळ सीमा धोकादायक बनली आहे. भारत-बांगलादेश आणि भारत-नेपाळ सीमेवरील मदरशांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे.मदरशांचा वापर उग्रवादाचा प्रसार करण्याकरता केला जातो. सीमा सुरक्षा बल या सिमेवर तैनात आहे. त्यांना घुसखोरी थांबवण्यात अपयश आले आहे.सीमा सुरक्षा बलाने नेपाळच्या आत जाउन हस्तकांना पकडले पाहिजे.
भारताच्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन आणि रॉ यांचे अधिकारी पुढील चौकशी करत आहेत. मुख्य आरोपी दुबईत पळून गेला आहे. त्याला नेपाळ सरकारच्या मदतीने भारतात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका अंदाजाप्रमाणे भारतात २०० ते २५० दहशतवादी सेल असावेत, ज्यांना विविध प्रकारची दहशतवादी कृत्ये करण्यास प्रवृत्त केले जाते. प्रत्येक वर्षी २० ते २५ अशा प्रकारच्या सेलचा छडा लावून बरबाद केले जाते. (http://www.satp.org/satporgtp/countries/india/timeline/index.html या दुव्यावर माहिती उपलध्द आहे )मात्र त्यांच्या जागी अजून नवीन सेल तयार केले जातात. या प्रत्येक सेलमध्ये पाच ते दहा दहशतवादी प्रवृत्तीचे युवक असू शकतात. मग ते आयएसआयच्या इशार्या वरुन विविध दहशतवादी कारवाया करत असतात.
२०१६ मध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ५२ भारतिय आयसिस दहशतवाद्यांना अटक केली. त्यातील १२ महाराष्ट्र १० केरळ, १० तेलंगणा, ५कर्नाटक, ४ उत्तर प्रदेश आणि पाच पश्चिम बंगाल इत्यादी ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. जम्मू काश्मिर, मध्यप्रदेश, दिल्ली इथून एक एक दहशतवाद्यांना अटक केली गेली. बहुतेक अटक झालेले दहशतवादी हे २५-३५ वर्षाचे आहेत. या बहुतेकांवर जहाल विचारसरणीचा परिणाम झालेला होता. बहुतेक हे सुशिक्षित आणि चांगल्या आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेले आहेत. यापूर्वी फक्त गरीब युवकच दहशतवादात सामील होत होते. आता मात्र इंटरनेटच्या जाळ्यातून फसलेले मध्यमवर्गीय अनेक युवक दहशतवादी संघटनेत सामील होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मधील ५०% हे अल हेदीत, ३० % तब्लगी आणि २० % देओबंदी विचारसरणीचे आहेत. त्यातील ८५ टक्के हे सुन्नी आहेत तर १५ टक्के हे इतर धर्मांतून इस्लाममध्ये धर्मांतरीत झालेले आहेत. यावरुन आयएसआय आणि आयसिस या दोन्ही संघटनांचा किती खोलवर प्रभाव पडला आहे याचा अंदाज येतो. पकडलेले गेलेले युवक हे हिमनगाचे टोक आहेत. त्याव्यतिरिक्त अनेक तरुण देशात काम करत असतील.
राष्ट्राची संपत्ती तीन मोठ्या भागात विभागली जाऊ शकते. पहिले राष्ट्रांविषयी गुप्त माहिती(Security of Information) शत्रूपर्यंत पोहोचायला नको. जसे - संरक्षण सिद्धता, आपल्याकडे असलेली शस्त्रे. दुसरे राष्ट्राची जनता. काही आपल्या नागरिकांना दुष्कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. ज्याला सबव्हर्जन(Subversion) म्हटले जाते. तिसरा धोका म्हणजे राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान ज्याला सॅबोटाज(Sabotage) असे म्हटले जाते.
नागपुरजवळच्या पुलगाव इथल्या दारुगोळा कारखान्यात आग लागली होती. तिथे १० हजार कोटीहुन अधिक किंमतीचा दारुगोळा खाक झाला होता. हा एक घातपात आयएसआयच्या हस्तकांनी घडवून आणला असावा.यापुर्वी दारुगोळा कारखान्यात लागलेल्या आगीचे कारण घातपात हे होते. आज आयएसआयने आपल्या देशातील कॅन्टोन्मेंट किंवा मोठ्या शस्त्र बनवणार्या फॅक्टरीच्या आसपास आपल्या हस्तकांना बसवले आहे. आपल्या गुप्तचर यंत्रणा/सुरक्षा यंत्रणा ढिल्या झाल्या की आत प्रवेश करुन मोठी घातपाताची काम ते करतात.
तीन पातळीवर हा बचाव करावा लागेल. राष्ट्राची गुप्त माहिती सुरक्षितच ठेवावी लागेल त्यासाठी सायबर सुरक्षा, दूरध्वनीवरील संभाषण शत्रुच्या कानी पडू नये म्हणून प्रयत्न, कॉम्प्युटरवरील माहितीचे संरक्षण,विविध सरकारी कार्यालयातिल महत्वाच्या कागज पत्राचे संरक्षण करावे लागेल.कोणी देशद्रोही नागरिक जर ही माहिती विकायचा प्रयत्न करत असेल तर त्याला पकडावे लागेल.
याशिवाय सबव्हर्शन म्हणजे युवकांचे मनपरिवर्तन करुन त्यांना दहशतवादी कृत्य करण्यास भाग पाडणे. अशा युवकांवरही लक्ष ठेवावे लागेल. कुठलाही युवक जिहादी किंवा अति डाव्या विचारसरणीचा प्रभावाखाली येत असेल किंवा दहशतवादी संघटनेत सामील होत असेल किंवा अशा प्रकारचे कृत्य करण्यास प्रवृत्त होत असेल तर त्याला थांबवावे लागेल.पूर्ण देशावरती लक्ष ठेवणे कोणत्याही गुप्तचर यंत्रणेला शक्य नाही. त्यामुळे सामान्य जनतेने आपल्या आजुबाजुला काय सुरु आहे यावर नजर ठेवणे गरजेचे आहे.
एक मोठा धोका राष्ट्रीय मालमत्तेच्या नासधुसीचा आहे. अगदी बसस्टँड असो की रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे कोणतीही संघटना किंवा युवक ही संपत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ही माहिती सुरक्षा एजन्सीला देणे आवश्यक आहे.
थोडक्यात पाकिस्तानने आपल्याविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा आणखीन एक प्रकार नेपाळमध्ये पकडलेल्या आयएसआय एजंटकडून समोर आलेला आहे. आपले खरे शत्रु चीन, पाकिस्तान, बांग्लादेश, डावे दहशतवादी/नक्षलवादी, जिहादी दहशतवादी आणि भारतविरोधी संस्था आणि भारतविरोधी नागरिक आहेत. सर्व देश एकत्र आल्यास आपण देशासमोरील बहुआयामी धोक्यांना उत्तर देण्यास समर्थ होऊ शकतो. आपसातील मतभेद कमी करुन देशवासियांनी शत्रुवर नजर ठेवण्यास मदत करावी.राजकीय इच्छाशक्ती असल्यास आणि मतपेटीचे राजकारण दूर ठेवल्यास आयएसआयला ताळ्यावर आणणे शक्य आहे.