www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचं कोलकत्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. ते ४९ वर्षांचे होते. अनेक बंगाली तसंच हिंदी सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.
ऋतुपर्णो घोष यांना आई-वडिलांकडूनच सिनेमाचा वारसा मिळाला होती. जाहिरात क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या ऋतुपर्णो यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी म्हणजेच १९९४ साली बंगली चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हिरेर अंगती (हिऱ्यांची अंगठी) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा... आणि या चित्रपटानंतर ते सतत एक एक पायरी चढतच गेले. त्यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा म्हणजे `उनीषे एप्रिल`... आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर रेनकोट, चोखेर बाली, द लास्ट लियर, नोका डुबी, सन ग्लास, चित्रांगदा, असुख, दहन अशा अनेक सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. त्यांना आजवर १२ राष्ट्रीय पुरस्कारांनी स्न्मानित करण्यात आलं होतं. `द लास्ट इअर` या त्यांच्या इंग्रजी सिनेमालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
आपल्या सिनेमातून त्यांनी वेळोवेळी वेगळ्या विषयांची हाताळणी करत आणि आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अजय देवगण अशा हिंदी चित्रपट सृष्टीतल्या मानब्बरांनी ऋतुपर्णोंच्या दिग्दर्शनाखाली काम केलं. अजय देवगण - ऐश्वर्या राय यांना घेऊन केलेल्या `रेनकोट` या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेप्रेमींची मनं जिंकली होती.
काही काळापासून ऋतुपर्णो यांना पॅनक्रेयाटिटिस हा आजार झाला होता. अशातच, आज सकाळी साडेसात वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि एक प्रतिभावंत दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.