www.24taas.com, दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई
मराठी भाषा टिकावी, यासाठी आपण नेहमीच गळे काढतो... जागतिक बदलांमध्ये मराठी भाषेला महत्त्वाचं स्थान मिळावं, यासाठी परिषदा आणि बैठकांमध्ये तासन् तास खल करतो. त्यामुळंच की काय, आमिर खानसारख्या हिंदी सिने अभिनेत्यांनाही मराठीची गोडी लागते. परंतु अमृताते पैजा जिंकणा-या मराठी भाषेबद्दल मुंबई विद्यापीठाला किती कळवळा आहे? जाणून घ्यायचंय... पाहूयात हा विशेष रिपोर्ट...
ऑल इज वेल... निदान मुंबई विद्यापीठात तरी तशी परिस्थती नाहीय.. कारण अमराठी भाषिकांना सोप्या आणि सुलभ रितीने मराठी शिकता यावं, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाला संवादात्मक मराठी हा कोर्स सुरु करायचा आहे. येत्या जूनपासून हा कोर्स सुरु करण्याचा जर्मन विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांची गरज आहे. मराठी भाषा शिकवण्याच्या या कोर्ससाठी ना विद्यापीठाकडे पैसे आहेत ना सरकारकडे... अशा परिस्थितीत चक्क सिने अभिनेता आमीर खान यानं मराठी भाषेसाठी मदतीचा हात पुढं केलाय... आमिरने या प्रकल्पासाठी तब्बल 25 लाख रुपयांची मदत केलीय.
आमिरला मराठी शिकवणारे मराठी भाषेचे तज्ञ सुहास लिमये या कोर्ससाठी मेहनत घेतायत. त्यांनी जर्मन विभागाच्या टीमसोबत आमिरची भेट घेतली. आधुनिक प्रणालीने मराठी शिकवण्याचा हा प्रोजेक्ट आमिरन पाहिला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता प्रकल्पाच्या एका लेवलसाठी लागणारी 25 लाख रुपयांची रक्कम देऊ केली.
एकीकडे अमराठी आमीर खान 25 लाख रूपये देत असताना, विद्यापीठ प्रशासनाचा नाकर्तेपणा ठळकपणे दिसून येतोय. मार्च 2012 साली या प्रकल्पाचं काम सुरू झालं. पण सुरुवातीला विद्यापीठानं कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आमिरने केलेली मदत पाहता विद्यापीठाने 1 लाख रुपये मदतीचं पत्र तर दिलं. पण त्याबाबतची बिलं अजून मंजूर केलेली नाहीत.
शिवाय या कोर्ससाठी विद्यापीठाकडून कोणतीही अधिकृत परवानगी न मिळाल्याने आमिरकडून मिळालेल्या रकमेचा फायदादेखील विभागाला करता येत नाहीय. त्यासाठी विभागाच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. मात्र, एक हाती रक्कम आम्ही देऊ, इतकंच आश्वासन सरकारकडून मिळलंय.
या कोर्सच्या माध्यमातून अमराठी भाषिकांना एका तासात मराठी बोलण्यास सुरुवात करता येईल असा जर्मन विभागाचा दावा आहे.
त्यामुळे मराठी भाषा टिकवायची असेल तर केवळ भाषा अभिजात करा अशी मागणी करुन चालणार नाही तर मराठी टिकवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे...आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या आणि मराठी भाषेवर प्रेम असलेल्या सर्वांनीच त्यासाठी आर्थिक मदत करावी असं आवाहन केलं जातंय.
मराठी भाषेसाठी एक अमराठी `फुंसूक वांगडू` धावून येतो.. पण दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाला, मराठीचा कैवार घेऊन राजकारण करणा-या नेत्यांना आणि मायबाप महाराष्ट्र सरकारला कधी जाग येणार?
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.