एक थी डायन : अभिनयाची कथेवर मात

विज्ञानचा भूत-प्रेत, डायन, आत्मा यांच्यावर अजिबात विश्वास नाही. हा सगळा प्रकार ‘अंधविश्वास’ म्हणून मानला जातो. पण, तंत्र-मंत्र मानणाऱ्यांच्या मते त्यांचं अस्तित्व असतं. पण, या चर्चा शेवटी निष्फळ ठरतात. त्यांचा अंत नाही. असू द्या आपण इथं बोलतोय ते शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘एक थी डायन’ या सिनेमाबद्दल...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 20, 2013, 08:24 AM IST


चित्रपट : एक थी डायन
दिग्दर्शक : कनन्न अय्यर
कलाकार : इमरान हाश्मी, हुमा कुरैशी, कल्कि कोचलिन, कोंकणा सेन शर्मा

www.24taas.com, मुंबई
विज्ञानचा भूत-प्रेत, डायन, आत्मा यांच्यावर अजिबात विश्वास नाही. हा सगळा प्रकार ‘अंधविश्वास’ म्हणून मानला जातो. पण, तंत्र-मंत्र मानणाऱ्यांच्या मते त्यांचं अस्तित्व असतं. पण, या चर्चा शेवटी निष्फळ ठरतात. त्यांचा अंत नाही. असू द्या आपण इथं बोलतोय ते शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘एक थी डायन’ या सिनेमाबद्दल... काळ्या जादूवर आधारित बेतलेली या सिनेमाची कथा. काळ्या जादूवर पूर्ण विश्वास ठेवून ही कथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आलीय.
थ्रीलर
‘एक थी डायन’ कदाचित पहिलाच असा सिनेमा म्हणावा लागेल जो जादू-टोन्यावर पूर्णत: विश्वास टाकून सादर करण्यात आलाय. त्यामुळे पडद्यावरही हा सिनेमा एक थरारक अनुभव देऊन जातो, जो तुम्हाला खचितच दुसऱ्या एखाद्या सिनेमातून पाहायला मिळाला असेल.
‘एक थी डायन’ सिनेमात ‘डायन’ (हडळ) या शब्दासोबत येणारे अनेक मिथक आणि परंपरा दाखवण्यात आल्यात ज्या गेल्या कित्येक वर्षांपासून अविरत सुरू आहेत. पण, या प्रकारांना मात्र हा सिनेमा अजिबात खतपाणी घालत नाही. आजच्या काळातील या सिनेमाची कथा... ज्यामध्ये ‘डायन’च्या लोककथेला मोठ्या खुबीनं पेरलं गेलंय.
दिग्दर्शक कनन्न अय्यर यांनी नैसर्गिकरित्या हा विषय सादर करण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीनं केलाय. ज्यामध्ये ‘डायन’, काळी जादू एका नव्या पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न केला गेलाय.

काय आहे सिनेमाची कथा
सिनेमाची कथा फिरते ती एका जादूगर बोबो (इमरान हाश्मी) भोवती... त्याची एक गर्लफ्रेंडही आहे... तामारा (हुमा कुरैशी)... दोघांनाही एखाद्या मुलाला दत्तक घेण्याची तीव्र इच्छा आहे. परंतू, यासाठी अट आहे ती म्हणजे या दोघांनीही लग्नच्या बंधनात अडकावं... त्यानंतर संमोहनाच्या माध्यमातून बोबोच्या लहानपणीच्या काही गोष्टी समोर यायला सुरुवात होते. ज्यामध्ये एका ‘डायन’नं न केवळ त्याच्या संपूर्ण परिवाराला उध्वस्त केलंय तर पुन्हा येऊन बोबोलादेखील घाबरवण्याचं वचनही दिलंय.
बोबो पहिल्यांदा तर या सगळया गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. पण, अचानक त्याच्या आयुष्यात पदार्पण होतं ते लीसा दत्त (कल्कि कोचलिन)चं... बोबोला लीसाचं डायन असल्याचा भास व्हायला सुरूवात होते. पण, जेव्हा सस्पेन्स हळूहळू खुलतो आणि खरीखुरी ‘डायन’ समोर येते तेव्हा प्रेक्षकांना एका नव्या रोमांचाचा अनुभव यायला सुरुवात होते. यामुळेच हा सस्पेन्स काय आहे हे तुम्ही स्वत: जाऊन अनुभवलेला जास्त चांगलं... नक्की ही ‘डायन’ आहे तरी कोण हे तुम्ही थिएटरमध्येच जाऊन पाहा... पण, एक मात्र नक्की की, जेव्हा तुम्हाला खरीखुरी डायन कोण आहे हे कळेल, तेव्हा मात्र तुमची भंबेरी उडेल. विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाच्या कथेला अनुरुप असं संगीत दिलंय.

उत्कृष्ट अभिनयाची झलक
सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाच्या बाबतीत म्हटलं तर कोंकणा सेन शर्मा हिनं उत्कृष्ट असाच परफॉर्मन्स दिलाय. आपण कोणत्याही भूमिका करण्यासाठी अगदी सक्षम आहोत, हे तिनं पुन्हा एकदा ठामपणे दाखवून दिलंय. इमरान हाश्मीचंही काम अतिशय सुंदर आहे. चित्रपटाचा भार त्यानं आपल्या सक्षम खांद्यावर पेलून नेलाय, असं म्हटलं तर अतिशयोक्ती वाटायला नको. जादूगाराच्या भूमिकेतला इमरान काही ठिकाणी ओव्हरअॅक्टींग करताना दिसतो, पण तो तेवढ्यापुरताच. कल्किनंही मस्त परफॉर्मन्स दिलाय. हुमानं तिच्या या अगोदरच्या दोन्ही सिनेमांमध्ये छोट्या शहरांतील मुलीचा रोल निभावला होता. त्यानंतर या सिनेमात मात्र हुमाचा नवा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.
मग, कधी जाताय ?
एकूणच काय तर ‘एक थी डायन’ हा एक कल्पनाशील आणि सुपरनॅचरल असा थ्रिलर चित्रपट म्हणावा लागेल. कथेमध्ये थोडी फार मार खात असली तरी टेक्निकल गोष्टींमध्ये या सिनेमानं बाजी मारलीय. जे प्रेक्षक थ्रीलर पाहण्यासाठी हा सिनेमा पाहायला जातील त्यांचा अपेक्षाभंग नक्कीच होणार नाही, भीतीचा पुरेपूर अनुभव या चित्रपटातून मिळतो.
सिनेमातील स्पेशल इफेक्टस्, आर्ट डायरेक्शन आणि साऊंड इफेक्टस् भन्नाटच म्हणावे लागतील. चित्रपट बघितल्याचा पस्तावा तुम्हाला होणार नाही, हे मात्र नक्की... मग, कधी जाताय या एका नव्या थ्रीलरचा अनुभव घ्यायला...