www.24taas.com, कोलंबो
गेल्या वर्षभरात वाईट कामगिरी केल्यामुळे भारतीय कसोटी टीमचा एकही सदस्य आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये आपलं नाव मिळवू शकला नाही. ‘वर्षातील सर्वश्रेष्ठ टेस्ट क्रिकेटर’ आणि ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटर’ या दोन्ही पुरस्कारांमध्येही एकाही भारतीय खेळाडूचं नाव नाही. इंग्लंड आणि द. आफ्रिकेच्या खेळाडूंचा मात्र या टीममध्ये दबदबा आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षभरात ८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय टीमचा पराभव केल्यामुळे नंबर एक असणाऱ्या भारतीय टीमची अक्षरशः धूळधाण उडाली. दरवर्षीप्रमाणे आयसीसीने यावेळी टेस्ट टीमची घोषणा केली, त्यात द. आफ्रिकेचे ५ आणि इंग्लंडचे ३ खेळाडू आहेत.
भारतीय क्रिकेट कॅप्टन महेंद्र सिंग धोणी आणि व्हाईस कॅप्टन विराट कोहली या दोघांची नावं आयसीसी वर्षातील ‘सर्वश्रेष्ठ एक दिवसीय क्रिकेटर’चा पुरस्काराच्या नामांकनामध्ये आहेत. तर सचिन तेंडुलकर ‘पीपल्स चॉइस’ पुरस्काराच्या शर्यतीत आहे. सचिनबरोबर द. आफ्रिकेचा हाशिम आमला, व्हेर्नन फिलांडर, ऑस्ट्रेलिय कॅप्टन मायकल क्लार्क आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा सर्वोच्च पुरस्काराच्या शर्यतीत आहे.