अभियांत्रिकीच्या ‘दुकाना’त ग्राहकच नाही

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अभियांत्रिकीच्या जागा भरण्यात कोणतीही अडचण भासत नसली तरी छोट्या गावातील परिस्थिती वेगळी आहे. वाशिम, हिंगोली आणि परभणी सारख्या गावांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ७७-८८ टक्के जागा रिकाम्या आहेत.

Updated: Nov 8, 2011, 01:05 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अभियांत्रिकीच्या जागा भरण्यात कोणतीही अडचण भासत नसली तरी छोट्या गावातील परिस्थिती वेगळी आहे. वाशिम, हिंगोली आणि परभणी सारख्या गावांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ७७-८८ टक्के जागा रिकाम्या आहेत.

 

या छोट्या शहरांच्या तुलनेत अकोला, वर्धा, सोलापूर, उस्मानाबाद आणि सातारा येथील परिस्थिती बरी असली तरी तब्बल ५० टक्के जागा रिकाम्या आहेत. छोट्या गावातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात स्थांलतर करतात. तसंच अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं परवडत नाही. याशिवाय छोट्या गावातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गुंतागुंतीची आणि किचकट ठरते. तसेच छोट्या गावातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसतं. त्यामुळे अर्ज भरताना ते चुका करतात आणि प्रवेशला मुकतात असं सनमती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वैशाली जैन यांनी सांगितलं.

 

या कॉलेजमध्ये ३०० जागा असताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून फक्त ८५ जागाच भरल्या गेल्या. केवळ २०-४० जागा भरल्या गेल्या तर महाविद्यालयं चालवणं अशक्य असल्याचं मत एका छोट्या गावातील प्राध्यापकांनी व्यक्त केलं. अनेक संस्था असलेल्या ट्रस्टनाच अशी महाविद्यालय चालवणं शक्य असल्याचं मतंही त्यांनी व्यक्त केलं.

 

अनेक संस्था असल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनांचा अधिक परिणामकारक वापर करता येतो. बाकी महाविद्यालयांना गाशा गुंडाळण्याशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांचे म्हणणं आहे. विद्यार्थी मोठ्या शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याला पसंती देतात कारण त्यांच्या मते अशा महाविद्यालयांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा आणि अध्यापक वर्गाचा लाभ मिळतो.