मुंबई : आज विद्यार्थी आणि राज्य सरकार दोघांचीही परीक्षा आहे. NEET सक्तीमुळे गाजलेली मेडिकल CET आज होतेय.
लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य या परीक्षेवर अवलंबून आहे. त्याच वेळी ही CET वैध आहे की नाही, याचाच निर्णय व्हायचाय. सुप्रीम कोर्टात याबाबत आज सुनावणी होणार आहे. निकाल आपल्या बाजूनं लागेल, याची राज्य सरकारला आशा आहे. मात्र एकीकडे परीक्षेची धाकधुक आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा, अशा कात्रीमध्ये HSCचे विद्यार्थी अडकलेत.
गेल्या काही दिवसापासून वादात असलेली राज्याची वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच सीईटी होणाराय... राज्यातले 4 लाख 9 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणारायत. मुंबईत 68 परीक्षा केंद्र असून राज्यात एकूण 1050 परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षा होणारेय. बायोलॉजी, मॅथेमॅटीक्स आणि मिक्स अशा तीन विभागात परीक्षा आहे.
दरम्यान, गुरूवारी वैद्यकीय नीटबाबतही दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणारेय. मेडिकल काउंसील ऑफ इंडिया आणि आरोग्य मंत्रालय कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करतील. त्यानंतर नीटबाबत अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाकडून घेण्यात येईल. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष राज्याच्या सीईटीकडे द्यावं, असं आवाहन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलंय.