www.24taas.com, मुंबई
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे -मुंबई असा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष केलं जात होतं. प्रवाशांना गुंगी आणणारं बिस्कीट खायला देऊन त्यांच्याकडील मौल्यवान दागिने आणि पैसे लुटले जात होतं. मात्र आता या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे, कारण प्रवाशांना सावज करणाऱ्या बिस्कीट गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे.एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे या टोळीच्या म्होरक्या गजाआड झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या बिस्कीट गँगचा म्होरक्या उमेशचंद्र आग्ररवालच्या मागावर होते. बिस्टीक गँगचा मास्टरमाईंड आरोपी उमेशचंद्र याच्यावर पुणे,मुंबई आणि राज्यातल्या इतर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी उमेशनं लोकांना लुटण्यासाठी एक अफलातून शक्कल शोधून काढली होती. गुन्हा करण्यासाठी उमेश आणि त्याची टोळी महामार्गावर उभे राहायचे. आणि लिफ्ट मागण्याचा बहाणा करत ही टोळी महामार्गावर धावणाऱ्या बस मध्ये प्रवेश मिळवायचे. बसमध्ये दाखल झाल्यावर उमेश सावज हेरत असे. सावज नक्की केल्या नंतर उमेश त्या सावजाच्या शेजारी बसत असे. त्यानंतर उमेश निवडलेल्या सावजाशी ओळख वाढवत असे.एकदा का शेजारच्या प्रवाशाशी ओळख वाढली की उमेशचा खरा खेळ सुरु व्हायचा. सावज जाळ्यात पूर्णपणे जाळ्यात अडकल्याची खात्री झाल्यावर उमेश त्याच्या जवळील गुंगीच औषध टाकलेलं बिस्कीट शेजारी बसणाऱ्या प्रवाशाला खायला देत असे.
उमेशने दिलेलं गुंगीच बिस्कीट शेजारी बसणाऱ्या प्रवाशाने खाताच त्या प्रवाशाला काही समजण्याच्या आतच तो प्रवाशी बेशुध्द होत असे. प्रवाशी बेशुद्ध झाल्याचं लक्षात येताच उमेश त्या प्रवाशाकडील रोख,मोबाईल आणि त्याच्या अंगावरील दागीने लंपास करत असे. आणि तो प्रवाशी शुद्धीवर येण्याआधीच उमेश पळालेला असायचा.
घटनेच्या दिवशीही उमेशचंद्र त्याच्या साथीदारांसोबत पुणे- मुंबई महामार्गावर सावज हेरत होता.पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या बसची ते वाट पहात होते. अशातच मुंबईच्या दिशेने जाणारी एक बस आली आणि उमेशचंद्रने त्याच्या साथीदारांसोबत त्या बस मध्ये प्रवेश मिळवला. बसमध्ये प्रवेश मिळवताच उमेश बसमध्ये आधीच बसलेल्या संजय यादवच्या शेजारी जाऊन बसला आणि उमेशने नेहमी प्रमाणे संजयशी ओळख वाढवण्यास सुरूवात केली आणि त्याला बिस्कीट खाण्यास दिलं. मात्र संजयने उमेशने देऊ केलेलं बिस्कीट घेण्यास नकार दिला. मात्र काही वेळाने पुन्हा उमेशने संजला बिस्कीट देऊ केलं. मात्र या वेळी उमेशकडून होणारा आग्रह पाहता संजयने आरोपी उमेशकडील गुंगीच ते बिस्कीट घेतलं. मात्र ते खात असतांनाच संजयला शंका आली आणि त्याने ते फेकून देत खाण्याचं नाटक केलं. बिस्कीट खाल्यानंतर संजयने बेशुद्ध झाल्याचं सोंग केलं आणि तो झोपी गेला. सावज जाळ्यात अडकल्याचं लक्षात येताच उमेशने संजयकडील मौल्यवान वस्तू लंपास करण्यास सुरवात केली मात्र इथेच उमेश चुकला आणि त्याच्या कृत्य़ाचा पर्दाफाश झाला.
संजयच्या सतर्कतेमुळे उमेशचं बिंग फुटलं. संजयने उमेशला त्याच्या अंगावरुन सोन्याची चेन चोरत असतांना आरडाओरड केली आणि त्याच्या हाताला झटका देऊन त्याचा डाव हाणून पाडला. संजयने आरोपी उमेशला पकडून आरडाओरड करण्यास सुरवात केली. अपंग संजयच्या या आरडाओरडीमुळे बसमधील इतर प्रवाशांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. आणि बसला थेट कुर्ला पोलीस ठाण्यात नेत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पोलिसांनी आरोपी उमेशचंद्र आग्रवालला अटक केली असुन घटेनेचा तपास सुरु केला. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी करुन त्यानं गुन्ह्यात वापरलेले गुंगीचे बिस्कीटं जप्त केली आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उमेशचंद्र हा गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी त्याच्या साथीदारांच्या मदतीने अशा पध्दतीने लोकांना लूटत असे. अशाच पध्दतीने आरोपीने अनेकांना लाखोंचा गंडविल्याचं तपासात उघड झालं आहे.पोलीस अटक आरोपी उमेशचंद्रकडे या प्रकरणाची चौकशी करत असून त्याच्या टोळीतील इतर साथीदारांचा शोध घेत आहे.