www.24taas.com, वृत्तसंस्था, श्रीनगर
भारताला नामोहरम करण्यासाठी पाकिस्ताने अतिरेक्यांशी हात मिळवणी केल्याचे भारत-पाक सीमेवर दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा सापडला आहे. पकडण्यात आलेला सर्व शस्त्रसाठा युद्धादरम्यान वापरण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या केरन सेक्टरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्कराने हाती घेतलेली मोहीमेत मोठा शस्त्रसाठा हाती लागला. या शस्त्रसाठ्यावरून युद्धाची तयारी केल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंतच्या कारवाई दरम्यान जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
लष्कराच्या जवानांनी केरन सेक्टरमध्ये शोधमोहीम हाती घेतली आणि या भागातून युद्धसदृश शस्त्र आणि दारूगोळ्याचा साठा जप्त केला आहे, असे कार्यकारी ब्रिगेडियर जनरल स्टाफ (बीजीएस) कर्नल संजय मित्रा यांनी पत्रकारांना सांगितले. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये सात एके-४७ रायफल्स, चार पिस्तुल्स, एक स्निपर रायफल, २० युबीजीएल ग्रेनेड्स, दोन रेडिओ सेट्स आणि युद्धादरम्यान लागणाऱ्या इतर साठ्याचा समावेश आहे. याशिवाय काही औषधे आणि खाद्यपदार्थही आहेत.
जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये असलेल्या सिगारेट आणि खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर ‘मेड इन पाकिस्तान’ असे लिहिलेले आहे. रविवारी लष्कराने केलेल्या कारवाईदरम्यान सहा एके रायफल्स, १० पिस्तुल्स, पाच रेडिओ सेट्स आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या असल्याचेही कर्नल मित्रा यांनी स्पष्ट केले.
३० ते ४० अतिरेक्यांच्या एका मोठ्या गटाने नियंत्रण रेषेवरून खोऱ्यात घुसखोरी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतीय लष्कराने गेल्या २४ सप्टेंबरपासून केरन सेक्टरमधील शालभाटी गाव आणि आजूबाजूच्या परिसरात शोध अभियान सुरू केले. आतापर्यंतच्या कारवाईत सात अतिरेक्यांना ठार करण्यात आले आहे. आणखी काही अतिरेकी ठार झाले असण्याची शक्यता आहे. परंतु, अतिरेकी त्यांचे मृतदेह सीमेपलीकडे नेण्यात यशस्वी झाले असावेत, असे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
व्हि़डिओ पाहा