www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील स्पर्धेने हल्ली टोक गाठलंय. शेजारच्या मंडळापेक्षा आपला गणपती जास्त फेमस व्हावा म्हणून गणपतीलाच राजा, महाराजा, पेशवा अशी बिरूदे लावण्याचं फॅड आलंय... गल्लीबोळात ही राजेशाही धुमाकूळ घालत असून, ‘उदंड जाहले राजे’ असे म्हणायची पाळी बिच्चा-या गणेशभक्तांवर आलीय..
पूर्वीच्या काळी राजालाच देव मानायची पद्धत होती.. काळाच्या ओघात राजेशाही संपली... राजांची संस्थाने खालसा झाली... देश स्वतंत्र झाला आणि लोकशाही नांदू लागली... पण या लोकशाहीत आता पुन्हा एकदा राजेशाहीने डोकं वर काढलेय... तमाम आबालवृद्धांचा लाडका गणपतीबाप्पाच आता राजा आणि महाराजा बनलाय... सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी आपापल्या गणपतीला फेमस करण्यासाठी त्याचा राजा आणि महाराजा असा राज्याभिषेक करतायत... मार्केटिंगच्या युगात गणेशालाही अमूक तमूक राजा म्हणून लेबलं लावली जातात. आणि एकदा का हा राजा फेमस झाला की, त्याच्या नावाने दरबारी प्रधानांची दुकानदारी सुरू आहे..
मुंबईत सर्वप्रथम गिरगावमधील निकदवरी लेनमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला गिरगावचा राजा संबोधण्यास सुरूवात झाली. लालबाग मार्केटच्या मंडळाने आपल्या गणपतीची नवसाला पावणारा गणपती अशी भलामण सुरू केली. एवढेच नव्हे तर `लालबागचा राजा` असा मंडळाचा राज्याभिषेक केला. जसजशी या गणपतीची लोकप्रियता वाढत गेली तसतशी आपापल्या गणपतीला राजा आणि महाराजा असं बिरूद चिकटवण्याचा मोह अन्य मंडळांना आवरता आला नाही. मध्यंतरी एका वेबसाइटने गणेश मंडळांची स्पर्धा आयोजित केली. त्यामध्ये उंचच उंच मूर्तींसाठी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या गणेशगल्ली मंडळाला सर्वाधिक मते मिळाली. तेव्हापासून या मंडळाने स्वतःला `मुंबईचा राजा` म्हणून घोषित केले.
आता तर गल्लीबोळात, रस्त्यारस्त्यांवर बाप्पांची संस्थानं सुरू झाली. अंधेरीचा राजा, फोर्टचा राजा, खेतवाडीचा महाराजा, प्रभादेवीचा राजा, एलफिन्स्टनचा राजा, परळचा महाराजा, वरळीचा राजा, राणीबागचा राजा, कॉटनग्रीनचा राजा, बोरिवलीचा राजा असे उदंड पीकच सध्या आलंय.... आपापल्या राजाच्या नावाचे टी शर्टस, कुडते, टोप्या आणि बँडस घालून कार्यकर्ते मोठ्या टेचात मिरवू लागलेत... विशेष म्हणजे या प्रत्येक राजा-महाराजा मंडळाला स्थानिक नगरसेवक, आमदार नाहीतर खासदार अशा राजकारण्यांचा वरदहस्त लाभलाय... मतांचं राजकारण आणि दानपेटीत जमणारा गल्ला यावर या राजकारण्यांचा डोळा असतो.
गझनीच्या मोहम्मदानं सोमनाथचं मंदिर एक-दोन नव्हे, तर 21 वेळा लुटलं... ते निव्वळ धर्मवेडापायी नव्हे, तर संपत्तीच्या लालसेपोटी.. गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस राजा-महाराजा गणपतीवाले भाविकांची अशीच लूट करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.