www.24taas.com, झी मीडिया, वडोदरा
आत्ताआत्तापर्यंत आपल्या वैवाहिक स्थितीवर चुप्पी साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आपण विवाहीत असून आपल्या पत्नीचं नाव `जशोदाबेन` असल्याची जाहीर कबुली शपथेवर दिलीय. त्यामुळे, मोदींचं हे `ओपन सिक्रेट` आता जगजाहीर झालंय.
बुधवारी, वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी ही कबुली दिलीय. वयाच्या १७ व्या वर्षी जवळजवळ आपल्याच वयाच्या जशोदाबेन यांच्याशी विवाह केलेल्या मोदींनी पहिल्यांदाच आपण `बॅचलर` नाही तर `विवाहीत` असल्याचं म्हटलंय.
पण, याचसोबत जशोदाबेन यांची सध्याची मिळकत किती आहे, त्यांचा पॅन नंबर काय आहे किंवा त्यांच्या इन्कमटॅक्स रिटर्न्स संदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही, असा उल्लेख मोदींनी यावेळी म्हटलंय. लोक अधिनियम १९५१ नुसार प्रत्येक उमेदवारानं आपल्या पती/पत्नीच्या मालमत्तेचा तपशील देणं बंधनकारक आहे.
जशोदाबेन या निवृत्त शिक्षिका आहेत. मोदींचं मूळ गाव वाडनगरपासून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्राह्मणवाडा गावात त्या एका शाळेत मुलांना शिकवण्याचं काम करत होत्या. लग्नानंतर दोन आठवड्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जशोदाबेन यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं.
वयाच्या ६३ व्या वर्षात पदार्पण केलेल्या आरएसएस प्रचारक मोदींनी २००१, २००२ २००७ आणि २०१२ या वर्षांत लढलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना `वैवाहिक स्थिती`चा रकाना रिकामाच सोडला होता. यावर, उमेदवारानं `वैवाहिक स्थिती`चा रकाना रिकामा सोडून नये, अशा आशयाची एक जनहित याचिका २०१२ साली सुप्रीम कोर्टानं धुडकावून लावली होती.
मोदींच्या या खुलाशानं त्यांच्या विरोधकांत मात्र आनंद पसरलाय. मोदींचा हा खुलासा त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत भारी पडण्याची शक्यता विरोधकांकडून वर्तवण्यात येतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.