www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
२०१४ च्या लोकसभा निडवणुकांवर दहशतवादाचं सावट दिसून येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सगळ्या पोलीस उपायुक्तांना एक अलर्ट जारी करण्यात आलाय. इंडियन मुजाहिद्दीनचा सह संस्थापक यासीन भटकळ याला सोडविण्यासाठी सिमी आणि आयएमचे दहशतवादी निवडणुकीदरम्यान नेत्यांच्या अपहरणाचा डाव आखू शकतात, असं सूचित करण्यात आलंय.
याबाबत गुप्तचर संस्थांनी दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी केलाय. यानंतर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यावर भर दिलाय. माहितीनुसार, इंडियन मुजाहिद्दीन आणि सिमीच्या दहशतवाद्यांनी मिळून हा कट रचलाय. यानुसार, निवडणुकीदरम्यान दहशतवादी हल्ल्यांचीही शक्यता वर्तवण्यात आलीय. या दहशतवादी कारवायामागचा मुख्य उद्देश म्हणजे यासिन भटकळ याची सुटका असू शकते, असंही सांगण्यात येतंय.
महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय चौकशी समितीनं फेब्रुवारी २०१३ मध्ये झालेल्या दुहेरी स्फोटात दाखल केलेल्या आरोपपत्रात इंडियन मुजाहिद्दीनच्या महत्त्वाच्या दहशतवाद्यांमध्ये समावेश असलेल्या यासीन भटकळ आणि असदुल्ला अख्तर यांच्या नावांचा समावेश आहे.
भटकळ आणि अख्तर यांच्यासहीत इंडियन मुजाहिद्दीनच्या इतर १२ सदस्यांवर भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया रचणं आणि त्यांना मूर्त स्वरुप देणं या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या कलमांखाली ४२ पानांचं आरोपपत्र दाखल करून फरार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. यातील मोहम्मद दानिश अन्सारी, मोहम्मद आफताब आलम, इमरान खान, सैयद मकबूल आणि ओबैद-उर-रहमान यांना अटक करण्यात यश आलंय.
तसंच, यासिन भटकळ आणि असदुल्ला अख्तर उर्फ हड्डी यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारत-नेपाळच्या सीमेजवळून अटक करण्यात आली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.