लंडन : आपल्यातील अनेकांचे केस ऐन तारुण्यातच पांढरे होतात. गेले काही दिवस आपण इंटरनेटवर अशा काही बातम्याही वाचल्या असतील की पर्यावरणीय कारणामुळे आपले केस पांढरे होतात किंवा तुमच्या शहरात असणाऱ्या प्रदूषणाचा प्रादुर्भाव तुमच्या केसांवर होतो.
पण, लंडनमधील काही शास्त्रज्ञांनी मात्र हे खोटे ठरवले आहे. त्यांच्या मते यामागे आनुवंशिक कारण असू शकते. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार केस पांढरे होण्यामागे केवळ आणि केवळ आनुवंशिक घटकच जबाबदार असतात.
यासाठी दक्षिण अमेरिका खंडातील सहा हजार लोकांवर यासंबंधीचे प्रयोग केले आहेत. या संशोधनात केसांचे रंग, त्यांची घनता आणि त्यांचा आकार या सर्वांचा अभ्यास केला गेला. त्यात व्यक्तींच्या जनुकांचा अभ्यासही केला गेला. या अभ्यासात 'आयआरएफ४' या जनुकाचा केसाचा रंग बदलण्याच्या भूमिकेत महत्त्वाची भूमिका असते असे या संशोधकांना आढळले आहे.
या जनुकाचा थेट संबंध मेलॅनिनशी असतो. मेलॅनिन हा तोच घटक असतो ज्यामुळे आपल्या त्वचेला आणि केसांना रंग प्राप्त होतो. यात त्यांनी पुरुषांच्या दाढी मिशीच्या केसांचाही अभ्यास केला आहे.