www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्वतंत्र तेलंगणासाठी सुरू असलेल्या साठ वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. युपीए समन्वय समितीच्या बैठकीत स्वतंत्र तेलंगणाबाबत एकमतानं निर्णय घेण्यात आला. युपीएच्या बैठकीनंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही तेलगणाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
युपीएपेक्षा सर्वांच्या नजरा रोखल्या गेल्या होत्या त्या काँग्रेसच्या बैठकीकडे. कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्यासह राज्यातल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तेलंगणाच्या निर्मितीला जोरदार विरोध दर्शवला होता. रेड्डी यांनी आक्रमक पवित्रा घेत हायकमांडला थेट राजीनाम्याच्याच इशारा दिला होता. मात्र राज्यातले काँग्रेसचे नेत्यांचे दिल्ली गेल्यानंतर जे होते ते रेड्डी यांचेही झाले आणि काँग्रेसच्या बैठकीतही स्वतंत्र तेलंगणावर शिक्कामोर्तब केलं.
आंध्र प्रदेशमधील 10 जिल्हे तेलंगणाच्या वाट्याला येणार आहेत. यात हैदराबादसह अदिलाबाद, खम्मम, करीमनगर, मेहबूबनगर, मेडक, नालगोंडा, निझामाबाद, रंगारेड्डी आणि वारंगल जिल्ह्याचा समावेश आहे. तेलंगणाचे क्षेत्रफळ - 114,840 चौ. किमी असून लोकसंख्या - 3 कोटी 52 लाख 86 हजार 757 एवढी आहे. तेलंगणा राज्यात 17 लोकसभा मतदारसंघांचा तर 119 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. तेलंगणारहित आंध्र प्रदेशमध्ये 13 जिल्हे राहणार असून यात अनंतपूर, चित्तूर, कडप्पा, कर्नूल, श्रीकाकुलम, विझियानाग्राम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, गुंटूर, प्रकाशम, नेल्लोर यांचा समावेश आहे. नव्या आंध्र प्रदेशचे क्षेत्रफळ - 160,205 चौ. किमी असून लोकसंख्या - 4 कोटी 93 लाख 69 हजार 776 आहे. नव्या आंध्रमध्ये 25 लोकसभा मतदारसंघ राहणार असून 175 विधानसभा मतदारसंघ आहेत.
वेगळ्या तेलंगणाला याआधीच प्रमुख विरोधी पक्ष भाजपनं पाठिंबा दिला होता. तर यूपीएचा घटक पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनं मात्र हा निर्णय धोकादायक असल्याचं म्हटलंय. हिंसक निदर्शनं करून आपल्या मागण्या मान्य होतात, असा चुकीचा संदेश यातून जाऊ शकतो, असं जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.