अहमदाबाद : १० देश, १० हजार किलोमीटरचा प्रवास आणि तोही बाईकवरुन... हे यशस्वी करुन दाखवलंय गुजरातमधल्या चार महिला बायकर्सनं...
केवळ ३९ दिवसांत त्यांनी ही मोहीम पूर्ण केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'बेटी बचाओं बेटी पढा़ओ' हा संदेश संपूर्ण जगात पोहोचवण्यासाठी या चौघींनी ही मोहीम सुरू केली होती.
'बायकिंग क्वीन्स' ग्रुपच्या युग्मा देसाई, ख्याती देसाई, सारिका मेहता आणि दुरिया तापिया अशी या चौघींची नावं आहेत. या मोहिमेदरम्यान ३९ दिवस त्यांना रोज नऊ तासांपेक्षा जास्त वेळ बाईक चालवावी लागली.
थायलंड, नेपाळ, व्हिएतनाम, भुटान, म्यानमार, सिंगापूर, कम्बोडिया, मलेशिया या देशांचाही त्यांच्या या प्रवासात समावेश होता. ६ जून २०१६ रोजी काठमांडूपासून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती.
काही वेळा तर जंगल, दऱ्याखोऱ्यांमधून खडतर वाटेवरुन त्यांना प्रवास करावा लागला. पंतप्रधानांनीही या चौघींच्या धाडसाचं कौतुक केलंय.