नवी दिल्ली : विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मजदक दिलशाद बलूच याने मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी म्हणू नका, असे आर्जव केले.
तो म्हणाला, मी एक बलूच आहे. जन्मस्थळावरून मला अनेकवेळा संकटाचा सामना करावा लागत आहे, अशी खंत मजदक दिलशाद बलूच याने व्यक्त केली.
मूळचा बलुचिस्तानचा आणि कॅनडाच्या पासपोर्टवर भारतात आलेल्या मजदकला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवल्यानंतर हा प्रकार सर्वांसमोर आला.
मजदकच्या पासपोर्टवर पाकिस्तान क्वेटा असा उल्लेख असल्याने दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मजदकची चौकशी केली.
दरम्यान, चित्रपट निर्माते असलेल्या मजदकच्या वडिलांना पाकिस्तानी लष्कराने अपहरण करून दोन वर्षे ताब्यात ठेवले होते. त्याच्या आईवरही अत्याचार करण्यात आला. तसेच संपत्तीही लुटण्यात आल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानकडून होणाऱ्या या अत्याचाराला कंटाळून त्याने २००८ मध्ये कॅनडामध्ये आश्रय घेतला. त्याला वाईट आलेल्या अनुभवावरुन त्याने मला कुत्रा म्हटले तरी चालेल पण पाकिस्तानी शिक्का नको, असे म्हटले.
मजदक आणि त्याची पत्नी सध्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत. पाकिस्तानला बलुचिस्तानची संस्कृती नष्ट करायची आहे. ते तिथे नरसंहार करत आहेत, हे सांगत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे.