www.24taas.com, नवी दिल्ली
सोनिया गांधींच्या उपचारांवर सरकारी खर्च झालेला नाही, असं स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयानं दिलंय. त्याचबरोबर मोदींनी यासंदर्भात केलेले आरोप खोटे असल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं म्हंटलंय. पण तरीही मोदींचा हल्लाबोल थांबलेला नाही.
सलग तिस-यांदा गुजरातची सत्ता ऱाखण्यासाठी नरेंद्र मोदी चांगलेच आक्रमक झालेत. त्यांच्या निशाण्यावर आहेत सोनिया गांधी... सोनियांवरच्या उपचारांवर सरकारी तिजोरीतून खर्च झाल्याता आरोप करत मोदींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. सोनिया गांधींच्या उपचारावर जर सरकारी तिजोरीतून एकही पैसा खर्च झाला नाही, तर याबद्दलचा खुलासा पंतप्रधान स्वतः का करत नाहीत, असा सवाल मोदींनी केला.
मोदींच्या या सवालानंतर पंतप्रधान कार्यालयानं तातडीनं स्पष्टीकरण देत, मोदींचे आरोप खोटे असल्याचं म्हंटलंय. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या स्पष्टीकरणानुसार सोनिया गांधींच्या दौ-यावर 1880 कोटी रुपयांच्या खर्चाचा आरोप चुकीचा आहे. सोनिया गांधींच्या कुठल्याही परदेश दौ-याचा किंवा उपचारांचा खर्च सरकारनं केलेला नाही. आठ वर्षांपूर्वी बेल्जियम सरकारनं सोनियांना एका समारंभासाठी आमंत्रित केलं होतं, त्या दौ-याचा खर्च इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशननं केला होता. आणि या दौ-याचा खर्च तीन लाखांपेक्षाही कमी झाला होता.
सोनिया गांधींच्या दौ-यांबद्दलचे हे आकडे पूर्ण सत्य बाहेर आणणारे नाहीत, असं मोदींचं म्हणणं आहे. गुजरात विधानसभा निवडणूक तोंडावर असताना, सध्या तरी हा मुद्दा इतक्यात शमणार नाही, अशीच चिन्हं आहेत.