चेन्नई : काही दिवसांपूर्वी रस्त्यावर आई-वडिलांसोबत भीक मागणारा एखादा मुलगा हातात पुस्तकं घेऊन केम्ब्रिजच्या महाविद्यालयात जाताना दिसला तर...
ही फिल्मी स्टोरी नाही तर खरीखुरी हकीगत आहे.... ही कथा आहे चेन्नईतल्या २२ वर्षांच्या जयवेलची... एकेकाळी आई-वडिलांसोबत रस्त्यावर भीक मागूनही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेला जयवेल आज केम्ब्रिजला जाऊन इंजिनिअर बनलाय.
जयवेल हा मूळचा आंध्रप्रदेशच्या नल्लौरचा... ८० च्या दशकात दुष्काळात आपलं सगळं काही गमावलेलं आणि कर्जाच्या डोंगराखाली दबून गेलेलं जयवेलचं कुटुंब दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी चेन्नईत दाखल झालं. जवळपास ५० कुटुंबांप्रमाणेच त्याच्या कुटुंबाकडेही ना खाण्यासाठी दाणा होता ना डोक्यावर छत... भीक मागून या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.
जयवेल लहान असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. आईला दारुचं व्यसन लागलं होतं. दिवसभरात भीक मागून जे थोडे फार पैसे मिळत होते ते आईला दारुसाठी द्यावे लागत होते.
याच दरम्यान, जयवेल उमा मुत्थुरमन यांच्या नजरेस पडला. आपल्या पतीसोबत उमा रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या आयुष्यावर 'पेवमेंट फ्लावर' नावाचा एक व्हिडिओ प्रोजेक्ट बनवत होत्या.
उमा यांनी या गरीब पण चुणचुणीत मुलाच्या आयुष्याला एक दिशा द्यायचं ठरवलं... आणि १९९९ साली त्यांनी जयवेलची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. उमा आणि त्यांच्या पतीनं एका एनजीओच्या मदतीनं जयवेलच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्याला प्रोत्साहन दिलं.
बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या जयवेलला आपल्या तल्लख बुद्धीची ओळख पटली... मदतीसाठी समोर आलेल्या अनेक हातांना निराश करायचं नाही ही जणू काही शपथच त्यानं घेतली.
याच दरम्यान त्यानं केम्ब्रिज विद्यापिठाची प्रवेश परीक्षा दिली... आणि त्याला यूकेच्या वेल्समधल्या ग्लेंडर युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला. इथं त्यानं आपलं इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं... या अभ्यासासाठी जयवेलला जवळपास १७ लाखांचा खर्च आला... हा सगळा खर्च उमाच्या ट्रस्टनं उचलला.
यानंतर आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्याला इटलीचे वेध लागलेत. यासाठी आणखी ८ लाखांची गरज जयवेलला लागणार आहे. त्याचं शिक्षण थांबणार नाही यासाठी उमा आणि मथुरमन हरेक प्रयत्न करत आहेत.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जयवेलला उमा आणि मथुरमननं पाडलेला पायंडा पुढेही सुरुच ठेवायचाय... आपल्यासारख्या अनेकांना मदतीचा हात द्यायचाय... त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करायचीय...