नवी दिल्ली: 'भारतीय जनता पक्षानं आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती' असा दावा 'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. तसंच 'आप'च्या ज्या १२ आमदारांना निवडणुका नको आहेत, तेही विश्वास यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्यायला तयार आहेत, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं विश्वास यांनी म्हटलं आहे. भाजपनं मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन दिवसांनी गाझियाबाद इथल्या निवासस्थानी पहिल्यांदाच खासदार बनलेल्या नेत्यानं विश्वास यांची भेट घेतली होती. विश्वास यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. '१९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास एक खासदार माझ्या घरी आले होते. पहाटे साडेतीनपर्यंत ते मला समजावत होते की भाजपचं सरकार बनवण्यासाठी मी मदत करावी. मुख्यमंत्री म्हणून मला समर्थन देण्यास ते तयार आहेत, असंही त्यांनी मला सांगितलं', असं विश्वास म्हणाले.
'पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून आपण इथं आल्याचा दावा त्या खासदारानं केला आणि मी या प्रस्तावास मंजूरी दिल्यास ते मला अशोका हॉटेलमध्ये नेऊन योग्य व्यक्तीची भेट घालून देतील, असंही त्यांनी सांगितलं. पण मी हा प्रस्ताव साफ फेटाळून लावला आणि पक्षाला (आप) याबद्दल लगेच कळवलं, असंही विश्वास पुढं म्हणाले. मात्र त्या खासदाराचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.
भारतीय जनता पक्षानं विश्वास यांनी केलेला दावा फेटाळून लावला असून 'विश्वास आत्ता याबद्दल का बोलत आहेत?' असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय सचिव आर. पी. सिंह यांनी विचारला आहे. 'अरविंद केजरीवाल माझ्या घरी आले होते आणि मला मु्ख्यमंत्रीपदाची ऑफर दिली' असा दावा मीही करू शकतो असं सांगत 'ह्या सर्व क्लृप्त्या फक्त चर्चेत राहण्यासाठी असल्याचा' आरोप सिंह यांनी केला आहे. 'एवढंच असेल तर त्यांनी त्या खासदाराचं नाव सांगावं', असंही सिंह म्हणाले.
विश्वास यांनी अमेठीतून निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.