लखनऊ: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुलायम म्हणाले, एका महिलेवर एकत्र चार पुरुष बलात्कार करू शकत नाहीत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रिक्षा चालकांसाठी मोफत ई-रिक्षा वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुलायम सिंह म्हणाले, रेप एकानं केला आणि चार जणांचं नाव लिहिलं, असं होऊ शकतं का? चार जण एकत्र बलात्कार करू शकतात का, हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? बदायू प्रकरणात सीबीआय चौकशी केलीय काय मिळालं, फक्त खोटं.
भारतातील मोठ-मोठे नेते आले म्हणाले चलो बदायू, सोनियाजींचा मुलगा (राहुल गांधी) पण आला. सीबीआय तपासात कळलं की बलात्कार झालाच नव्हता. चुलत भावानं जमिनीच्या वादातून ही हत्या केली होती. आम्ही सांगत होतो बलात्कार झाला नाही, मात्र सरकारला बदनाम करण्यासाठी हा कट रचला होता.
मुलायम सिंह यांनी दुसऱ्या राज्यांचं उदाहरण देत उत्तर प्रदेश अपराधाच्या बाबतीत कमी धोकादायक म्हटलंय. मध्यप्रदेशमध्ये ९ टक्के आणि राजस्थानमध्ये ७ टक्क्यांहून अधिक बलात्काराचं प्रमाण आहे, असं मुलायम सिंह म्हणाले. यापूर्वीही मुंबई बलात्कार प्रकरणातील आरोपींची बाजू घेत बच्चोंसे गलतिया होती है, असं मुलायम सिंह म्हणाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.