नवी दिल्ली : गेल्या वर्षी मोदी सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या योजनांमुळे देशात नोकऱ्यांचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
देशात स्टार्टअप्स आणि ई-कॉमर्स उद्योगात नोकऱ्यांच्या संधी जोमानं वाढताना दिसत आहेत. 'क्लिक जॉब्स डॉट कॉम'नं केलेल्या एका अभ्यासात हे निष्कर्ष समोर आलेत.
अभ्यासानुसार, २०१६ या वर्षांत जवळपास १२ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. २०१५ या वर्षांत आयटी, ई-कॉमर्स, दूरसंचार, रिटेल, पायाभूत सुविधा, स्वास्थ आणि फार्मा, बँकिंग तसंच अर्थ, मीडिया - मनोरंजन आणि शिक्षा या क्षेत्रानं अधिकाधिक नोकऱ्या निर्माण केल्याचं दिसून आलं.
या निष्कर्षामध्ये उल्लेख करण्यात आल्यानुसार, खाजगी क्षेत्रात नव्या कर्मचाऱ्यांची भर्तीचा आलेख ४५ टक्क्यांनी वाढता राहू शकतो. तर वेतनदरातही २०-३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षात विमान, मीडिया-मनोरंजन, शिक्षा, आयटी आणि ई-कॉमर्स या क्षेत्रात उद्योग जोमानं वाढण्याची चिन्हं आहेत.