www.24taas.com, नवी दिल्ली
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला मुख्य सूत्रधार हाफीज सईद याचा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंगांनी आदरयुक्त उल्लेख केला. हाफिज सईद ‘साहेब’ वक्तव्य करुन त्यांनी आणखी एक वाद ओढवून घेतलाय. भाजप आणि रा.स्व.सं सारख्या संघटनांना दहशतवाद्यांचे कॅम्प म्हणणाऱ्या शिंदेंची पाठराखण करत आंतरराष्ट्रीय आतंकवाद्याला साहेब म्हटल्याबद्दल दिग्विजय सिंग यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
आरएसएस आणि भाजप काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत असताना काँग्रेसकडून दिग्विजय सिंग यांनी सुशीलकुमार शिंदेंची पाठराखण केली. शिंदे जे काही म्हमाले, ते मी गेल्या ११ वर्षांपासून म्हणत आहे, असं दिग्विजय सिंग म्हणाले. याचवेळी बोलताना दिग्विजय सिंग यांनी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या हाफिझ सईदचा आदरयुक्त उल्लेख करत म्हटले, की ‘सईद साहेबां’वर पाकिस्तान कारवाई करत आहे. हाफिझ सईदचा उल्लेख ‘साहेब’ केल्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
हाफिज सईद हा पाकिस्तानमधील `जमात-उद-दवा` या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवाया करणा-या `लष्कर-ए-तोयबा` या संघटनेचा संस्थापक आहे. हाफिज सईद हा मुंबईवरील २००८ मध्ये झालेल्या २६-११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आहे. अमेरिकेने जगभरातील दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात त्याचं नाव आहे. इतकंच नाही तर अमेरिकेने हाफीजला पकडण्याठी ५० कोटींचे बक्षिस जाहीर केलंय. अशा दहशतवाद्याला साहेब म्हणत दिग्विजय सिंगांनी वाद पेटवला आहे.