www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली ,
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत माफी मागावी नाही तर राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. केजरीवाल यांनी काल भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केलीय. त्यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, नितीन गडकरींह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचंही नाव आहे.
या यादीसंदर्भात केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस देणार असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. त्याचबरोबर केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. अरविंद केजरीवालांनी एकदा पुन्हा वाद ओढावून घेतला आहे. शुक्रवारी अरविंद केजरीवालांनी भ्रष्टनेत्यांची यादी जाहीर केली. त्यानंतर केजरीवालांवर चहुबाजुनीं टीका होऊ लागली आहे.
केजरीवालांनी सर्वाधिक भ्रष्टनेत्यांच्या यादीत भाजपचे माजी अध्यक्ष नितिन गडकरींचा समावेश केला आहे. त्यामुळे नितिन गडकरींनी केजरीवालांना नोटीस पाठवली आहे.
आपलं विधान तीन दिवसाच्या आत मागे घ्या. असं न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं गडकरीनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय. केजरीवाल बिनबुडाचे आरोप करत आहेत. तसेच आपल्या विधानावर केजरीवालांनी जाहीरपणे प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली माफी मागावी. अन्यथा केजरीवांलाच्या विरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा नितिन गडकरींनी केजरीवालांना दिलायं.
भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींच्या मते केजरीवालांना आंदोलन करणे आणि सरकार चालवण्यातील फरक समजत नाही. केजरीवालांनी आरोप करताना पुरावे द्यावेत नाहीतर बिनबुडाच्या आरोपांसाठी माफी मागावी. केजरीवाल आपल्या प्रतिस्पर्धी नेत्यावर आरोपकरून त्यांचे चारीत्र्यहनन करत आहेत , असं मत सुधांशु त्रिवेदींनी नमूद केलयं
आसामचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते तरूण गोगईंचा समावेश केजरीवालांच्या यादीत आहे. त्यामुळे नाराज गोगईंनी केजरीवालांना आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.
आसामच्या जनतेनं मला कधी भ्रष्ट म्हटलं नाही. माझ्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. केजरीवालांनी आसाममध्ये लोकसभेला उमेद्वार उभे करावेत आसामची जनताच केजरीवालांना त्यांची जागा दाखवेल, असं मत तरूण गोगईंनी व्यक्त केलयं.
प्रतिमा निर्मिती आणि ब्रँडिगसाठी ५०० कोटी रूपये खर्च केल्याचा आरोप करीत. भाजपच्या नरेंद्र मोदींचा आणि राहुल गांधीचा समावेश केजरीवालांच्या यादीत केला गेला आहे. भ्रष्टाचार, राजकारणतील गुन्हेगारीकरण, असे आरोप करीत केजरीवालांनी यादीतील भ्रष्ट नेत्यांसमोर उमेद्वार उभे करण्याचे जाहीर केले आहे.
या यादीत केंद्रिय मंत्री सुशिलकुमार शिंदे, पी. चिदंबरम्, यांच्यासह मुलायम सिंह यादव, मायावती, सोनिया गांधी, शरद पवार या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
आपचे प्रवक्ते दिलीप पांडे यांनी सांगितले की, आम आदमी पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधीवर वंशवादामुळे तर नरेंद्र मोदीवर राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्यामुळे त्यांचे नाव या यादीत आहे.
आपण तयार केलेल्या सर्वाधिक भ्रष्टनेत्यांच्या यादीत असलेल्यांना संसदेत पाठवू नये, असं आवाहन केजरीवालांनी देशातील जनतेला केलं आहे.