गुना : मध्य प्रदेशमध्ये कालापाठ येथे काही महिला भारतीय स्टेट बॅंकमध्ये आज शनिवारी दुपारी आपल्याकडील 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आल्या होत्या. यावेळी एक तरुणीही रांगेत उभी होती. त्यावेळी उपस्थित महिलांची नजर तिच्यावर पडली आणि चक्रेच फिरलीत.
या तरुणीने अनेक महिलांना फसविल्याचे उघड झाले आणि उपस्थित रांगेतील महिला आक्रमक झाल्यात. काहींनी तात्काळ 100 नंबरवर पोलिसांना फोन करुन बोलवून घेतले. दरम्यान, या तरुणीला पकडून केंट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांच्या तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केलेय.
कालापाठ परिसरातील 11 महिलांनी या तरुणीवर फसविल्याचा आरोप केलाय. वर्षाभरापूर्वी या तरुणींने आणि तिच्या सहकाऱ्यांनी इंदोर येथे स्वसहायता समूहच्या नावावर 1300-1300 रुपये घेऊन 25 हजार रुपये कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कंपनीचे कर्मचारी पैसे घेऊन पोबारा केला. दरम्यान, त्यांनी दिलेले चेक वटले नाहीत. ते बाऊंस झालेत. ही बाब लक्षात आल्यानंतर तक्रारही करण्यात आली होती. मात्र, पुढे काहीही कारवाई झाली नव्हती.
तेव्हापासून ही तरुणी गायब होती. केंट पोलीस स्टेशनमध्ये महिलांनी लेखी तक्रार केली होती. दरम्यान, पकडण्यात आलेली तरुणीचे म्हणणे आहे की, मी 7 हजार रुपयांवर नोकरी करीत होती. ही तरुणी गुना येथील राहाणारी आहे. ती नोटा बदल्यासाठी आली असता तिला काही महिलांनी पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.